मानसिक ताणाचा त्वचा आणि केसांवरही होतो परिणाम; तज्ज्ञांचे मार्गदर्शन; सक्षम कौन्सिलींग सेंटर व इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीचा संयुक्त उपक्रम; आंतरराष्ट्रीय मानसिक आरोग्य दिनानिमित्त ऑनलाइन वेबिनार उत्साहात

भुसावळ (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय मानसिक आरोग्य दिनानिमित्त सक्षम कौन्सिलींग सेंटर, भुसावळ आणि इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मानसिक ताण आणि बाह्य सौंदर्य’ या विषयावर ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले. पुण्याच्या प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. प्राची प्रताप आणि समुपदेशक आरती चौधरी यांनी यावेळी मार्गदर्शन करत मानसिक आरोग्य आणि शारीरिक सौंदर्य यांचा परस्परसंबंध स्पष्ट केला. दैनंदिन जीवनातील ताणतणावाचे व्यवस्थापन, भावनांचा स्वीकार आणि त्वचा व केसांच्या आरोग्यासाठी योग्य काळजी घेण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा योगिता वायकोळे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून रजनी सावकारे, तर विशेष उपस्थिती म्हणून डॉ. सुवर्णा गाडेकर उपस्थित होत्या.

नकारात्मक भावनांचा स्वीकार करणेही महत्त्वाचे

समुपदेशक आरती चौधरी यांनी मानसिक आरोग्याविषयी समाजात वाढत असलेल्या जागरूकतेबद्दल समाधान व्यक्त केले. गेल्या पाच वर्षांपासून सक्षम कौन्सिलींग सेंटरतर्फे आंतरराष्ट्रीय मानसिक आरोग्य दिनानिमित्त सातत्याने वेबिनार आयोजित करण्यात येत असून, दरवर्षी सहभागींची संख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

“सकारात्मक राहणे महत्त्वाचे असले, तरी मनात कधीकधी नकारात्मक भावना निर्माण झाल्यास स्वतःला दोषी समजू नये,” असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला. आपल्या भावनांचा स्वीकार करणे आणि त्यांना समजून घेणे हे मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडियावर इतरांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना केल्यामुळे अनेकदा व्यक्ती स्वतःच्या आयुष्याबद्दल दुःखी होते. मात्र, प्रत्येकाचा जीवनप्रवास वेगळा असतो. सोशल मीडियावर दिसणारे चित्र म्हणजे संपूर्ण आयुष्य नसून त्यातील काही निवडक क्षण असतात. त्यामुळे आपल्या आनंदाचे आणि भावनिक स्वास्थ्याचे मोजमाप सोशल मीडियाच्या आधारे करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

ताणतणावाचा त्वचा व केसांवर परिणाम

त्वचारोगतज्ज्ञ डॉ. प्राची प्रताप यांनी मानसिक ताणाचा त्वचा आणि केसांवर होणारा परिणाम शास्त्रीय दृष्टिकोनातून स्पष्ट केला. ताणतणावामुळे त्वचा व केसांशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ताणाचे व्यवस्थापन, त्वचेची योग्य निगा आणि आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

त्वचेवरील पांढरे डाग अर्थात कोड या विषयाबाबत समाजात असलेल्या गैरसमजांवरही त्यांनी प्रकाश टाकला. या समस्येकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहावे, योग्य माहिती जाणून घ्यावी आणि गैरसमजांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

प्रश्नोत्तरांतून शंकांचे निरसन

या वेबिनारमध्ये जळगाव येथील क्षमा फेगडे यांनी विषयाशी संबंधित समर्पक प्रश्न विचारून चर्चेला अधिक माहितीपूर्ण व संवादात्मक स्वरूप दिले. भुसावळ, जळगाव, नाशिक आणि पुणे येथील अनेक नागरिक ऑनलाइन सहभागी झाले होते. प्रश्नोत्तरांच्या सत्रात तज्ज्ञांनी सहभागींच्या विविध शंकांचे निरसन केले. डॉ. उर्मी ठक्कर यांनी झूम प्लॅटफॉर्मवरील तांत्रिक व्यवस्थापनासाठी सहकार्य केले.

मानसिक आरोग्य ही निरोगी जीवनाची मूलभूत गरज

मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढविणे, ताणतणावाकडे सकारात्मक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणे आणि मानसिक आरोग्यासोबतच शारीरिक आरोग्याची काळजी घेणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

मानसिक आरोग्याची काळजी घेणे ही चैनीची बाब नसून निरोगी जीवनाची मूलभूत गरज आहे. मनातील भावना समजून घेणे, इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःचा स्वीकार करणे आणि ताणतणाव जाणवल्यास मदत घेण्यास संकोच न करणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्याविषयीचे गैरसमज दूर करून स्वतःसोबतच कुटुंबीयांच्या भावनिक स्वास्थ्यालाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन या वेबिनारच्या माध्यमातून करण्यात आले.

‘मन मोकळे करा, मदतीचा हात पुढे करा आणि मानसिक आरोग्याबाबत जागरूक समाज घडविण्यास हातभार लावा,’ हा महत्त्वपूर्ण संदेश या उपक्रमातून देण्यात आला.