भुसावळ (प्रतिनिधी) - मौजे भुसावळ (ता. भुसावळ, जि. जळगाव) हद्दीबाहेरील सर्व्हे नं. ११५/१/अ मधील प्लॉट नं. ०९ (क्षेत्र ४६९.३७ चौ.मी.) या जागेवर रहिवास प्रयोजनार्थ सुधारीत व भोगवटा बांधकाम परवानगी मिळवण्यासाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावरून आणि त्यातील कथित बनावट कागदपत्रांवरून मोठा विवाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी महसूल प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले असून, अर्जदार प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी भुसावळ तहसीलदार, भुसावळ उपविभागीय अधिकारी (SDO) आणि नगररचना विभागाकडे या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रकरणाची पार्श्वभूमी श्री. रविंद्र वामनराव तळेले यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मौजे भुसावळ येथील उक्त प्लॉटवर रहिवास प्रयोजनार्थ सुधारीत व बांधकाम परवानगी मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जाच्या चौकशीसाठी तहसीलमार्फत मंडळ अधिकारी भुसावळ यांना निर्देश देण्यात आले होते. मात्र, मंडळ अधिकारी यांनी नोंदवलेले बिल्डरचे जबाब, प्रत्यक्ष पंचनामा आणि तहसीलदार कार्यालयातील पत्रव्यवहार यांमध्ये मोठी तफावत व विसंगती असल्याचे समोर आले आहे. मंडळ अधिकारी यांनी केलेल्या चौकशी अहवालानुसार व जबाबपत्रामध्ये भूखंड पडीत आहे व विषयाकित भुखंडवर बांधकाम झालेलेनाही / अगर सुरू नाही आहे . यापैकी काहीही असे (नसल्याचे व असल्याचे ) नमूद करण्यात आले नाही आहे, परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. तक्रारदाराचे गंभीर आरोप व आक्षेप दिशाभूल करणारा व संशयास्पद पंचनामा: मंडळ अधिकारी यांनी तयार केलेल्या पंचनाम्यामध्ये पंचांचे रहिवासी पुरावे, ओळखपत्रे किंवा त्यांचे ओळख क्रमांक नमूद केलेले नाहीत, ज्यामुळे हा पंचनामा संशयास्पद व बनावट असल्याचा आरोप आहे. दस्तऐवजांमध्ये खाडाखोड: तहसीलदार कार्यालयीन पत्रावरील जावक क्रमांक आणि विषय यांसारख्या नोंदींमध्ये पेनने जाणीवपूर्वक खाडाखोड व छेडछाड करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. अस्तित्वात असलेले बांधकाम व पुरावे: संबंधित जागेवर आणि इमारतीवर बऱ्याच आधीपासून बांधकाम चालू होते असा दावा करत, तक्रारदाराने गुगल मॅपच्या जुन्या सॅटेलाइट इमेजेस, मुलाच्या विवाहाची पत्रिका व छायाचित्रे पुरावा म्हणून सादर केली आहेत. मोबाईल टॉवरचा भाडेकरार: या इमारतीच्या टेरेसवर मोबाईल टॉवर बसवण्यासाठी ६ डिसेंबर २०२१ रोजीच भाडेकरारनामा (दस्त क्र. ५७८१/२०२१) झाला असून, विवाहापूर्वीच हे बांधकाम अस्तित्वात असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच नंतर या इमारतीचे कायदेशीर खरेदीखत (क्र. २९७७/२०२३, दि. २३/०६/२०२३) झाले असल्याचे म्हटले आहे. कार्यालयीन दस्तऐवजांची पडताळणी व त्रुटी: प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी माहिती अधिकार अंतर्गत माहिती घेण्यापूर्वी सर्व्हे नं. ११५/१अ प्लॉट नंबर ९ ची मंजुरी फाईल तपासली असता, त्यामध्ये सदर भूखंड भुसावळ नगरपरिषद हद्दीबाहेर असल्याबाबत कोणतेही अधिकृत प्रमाणपत्र किंवा नोंद फाईलीत आढळली नाही. कर्मचाऱ्यांवर संगनमताचा आरोप: फाईल हाताळणाऱ्या महसूल सहाय्यक कर्मचाऱ्याने कागदपत्रांची कोणतीही खात्री न करता जळगाव नगर रचना विभाग आणि भुसावळ उपविभागीय कार्यालय यांची जाणीवपूर्वक दिशाभूल केल्याचा आरोप प्रमोद पाटील यांनी केला आहे. चुकीचा आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यास तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. प्रशासकीय निष्क्रियतेबाबत संताप या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी प्रमोद पाटील यांनी यापूर्वीच २६ जानेवारी रोजी शिवतीर्थ मैदानावर सहपत्नी उपोषण करण्यासाठी बसले होते तेव्हा जिल्हाधिकारी साहेब यांना सविस्तर निवेदन दिले होते. परंतु, एवढा गंभीर प्रकार घडलेला असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस चौकशी करण्यात आली नाही व विचारलेल्या अर्जावर कोणतेही उत्तर मिळाले नाही, असा संतापजनक आरोप तक्रारदाराने केला आहे. ठाम मागण्या खोटा पंचनामा तयार करून आणि कागदपत्रांत फेरफार करून प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या संबंधित मंडळ अधिकारी, पंच आणि बिल्डर यांची सखोल चौकशी करावी, चौकशीत दोषी आढळल्यास संबंधित महसूल कर्मचारी व मंडळ अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हे (FIR) दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महसूल मंत्री, नाशिक विभाग आयुक्त तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे लवकरच उच्चस्तरीय स्वाक्षरीने सविस्तर तक्रार व निवेदन सादर केले जाणार आहे.


