श्रीकृष्ण जयंतीला कदंब व पारिजातकाचे झाड लावण्याचा संकल्प करा ; पर्यावरण संवर्धनासाठी संगोपनासहित वृक्षारोपण करण्याचे डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी) : श्रीकृष्ण जयंती अर्थात जन्माष्टमीचा उत्सव भक्तिभावाने साजरा करताना यंदा प्रसादरूपात भगवान श्रीकृष्णांना प्रिय असलेले कदंब तसेच पारिजातकाचे झाड संगोपनासहित लावण्याचा संकल्प करावा, असे आवाहन पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्रचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी केले आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सर्वांसाठी आनंदाचा आणि भक्तीचा क्षण असतो. देशभरातील श्रीकृष्ण मंदिरांसह घराघरांत पाळणा बांधून, गोपाळकाला करून तसेच विविध भजने व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून हा उत्सव साजरा केला जातो. या भक्तिमय उत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देणे काळाची गरज असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड, जंगल क्षेत्रातील घट आणि निसर्गनिर्मित साधनसंपत्तीचा ऱ्हास यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. वातावरणातील बदलामुळे तापमानवाढ, चक्रीवादळे, ढगफुटीसदृश्य पाऊस, महापूर तसेच विविध आजारांसारख्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे.

भगवान श्रीकृष्णांना कदंब वृक्ष अत्यंत प्रिय मानला जातो. द्वापार युगात श्रीकृष्णांनी यमुनेच्या काठी वृंदावनातील कदंबवनात बासरी वाजवत अनेक लीला केल्याचे धार्मिक संदर्भ आहेत. कदंबाचे झाड सदाहरित असून पर्यावरणासाठी उपयुक्त आहे. त्याची फुले व फळांनाही आयुर्वेदात महत्त्व आहे.

त्याचप्रमाणे पारिजातक अर्थात प्राजक्ताचे झाडही धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. रात्री उमलणारी आणि सकाळी सूर्योदयाच्या वेळी गळून पडणारी पारिजातकाची फुले सुगंधासाठी प्रसिद्ध आहेत. आयुर्वेदातही या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान आहे. घरासमोर पारिजातकाचे झाड शुभदायी मानले जाते.

यंदाच्या जन्माष्टमीला श्रीकृष्णाला प्रिय असलेल्या कदंब आणि पारिजातक या दोन्ही वृक्षांची लागवड करून त्यांचे नियमित संगोपन करण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाला हातभार लागण्याबरोबरच पंतप्रधानांच्या ‘एक पेड माँ के नाम’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यातही नागरिकांचा सहभाग नोंदविला जाईल, असे डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी सांगितले.