नाहाटा महाविद्यालयात रानभाजी महोत्सव उत्साहात ; ओळख, आरोग्य आणि पाककला’ कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ;

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ येथील कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे २ सप्टेंबर २०२६ रोजी ‘रानभाजी महोत्सव – ओळख, आरोग्य आणि पाककला’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पावसाळ्यात, विशेषतः श्रावण महिन्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असून, त्यामध्ये शरीरासाठी आवश्यक विविध पोषक घटकांचा समावेश असतो. त्यामुळे रानभाज्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या विविध पाककृती विद्यार्थ्यांनी आपल्या आईकडून शिकून घ्याव्यात, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी केले.

यावेळी प्राचार्य डॉ. बऱ्हाटे यांनी आपल्या लहानपणी खाल्लेल्या दोडी, अळूची वळी आणि कटूर्ले या रानभाज्यांच्या आठवणींना उजाळा दिला. वनस्पतीशास्त्र विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी विभागाचे कौतुक केले.

रानभाजी महोत्सवानिमित्त विविध रानभाज्यांचे प्रदर्शन तसेच त्यापासून तयार करण्यात आलेल्या पाककृतींचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उंबर, सराटा, पानांचा ओवा, शेवगा, आघाडा, अंबाडी, चिवळ, अळू, कटूर्ले आदी विविध रानभाज्यांपासून रुचकर पाककृती तयार करून आणल्या. विद्यार्थ्यांनी या भाज्यांची शास्त्रीय नावे, त्यांचे आरोग्यविषयक महत्त्व तसेच पाककृतीची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. उपस्थितांनी विविध पाककृतींचा आस्वाद घेतला.

विशेष म्हणजे वनस्पतीशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसह महाविद्यालयातील इतर विषयांच्या विद्यार्थ्यांनीही या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ. डी. एन. पाटील, उपप्राचार्य डॉ. जी. आर. वाणी, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सौ. विद्या पाटील, प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. एम. जे. जाधव यांच्यासह विविध विषयांचे प्राध्यापक उपस्थित होते. त्यांनी रानभाज्यांची माहिती जाणून घेत त्यांच्या पाककृतींचा आस्वाद घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एस.वाय.बी.एस्सी.चा विद्यार्थी शोएब अन्सारी याने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.