मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर; ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार ; १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांनी नाव नोंदवावे; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाने १ नोव्हेंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील प्रारूप मतदार याद्या ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या प्रारूप यादीनुसार जिल्ह्यात सध्या एकूण ३० लाख ३७ हजार ४५६ मतदार आहेत.

प्रारूप मतदार यादी संबंधित मतदान केंद्रे, तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालये, मतदार नोंदणी अधिकारी कार्यालये तसेच जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करण्याची संधी

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६, नोंदीतील दुरुस्तीसाठी नमुना ८, तर मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी नमुना ७ भरता येईल. हे अर्ज voters.eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध आहेत.

५ लाखांहून अधिक नावे प्रारूप यादीत नाहीत

गणनापत्रक (Enumeration Form) BLO कडे जमा न केलेल्या ५ लाख १४ हजार ८३६ मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. यामध्ये ९३ हजार ७०९ मयत मतदार, ९५ हजार ८०८ गैरहजर मतदार, २ लाख ६२ हजार ५४५ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, १ हजार ७४० इतर मतदार आणि यापूर्वीच नोंदणी झालेले ६१ हजार ३४ मतदार यांचा समावेश आहे.

मयत मतदार वगळता पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी विहित कालावधीत दावे दाखल करावेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

२९ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी; ४ नोव्हेंबरला अंतिम यादी

विसंगत नोंदींबाबत ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नोटिसा बजावून सुनावणी घेण्यात येणार आहे. तसेच प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. त्यानंतर अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

मतदान केंद्रांची संख्याही वाढणार

जळगाव जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या पूर्वीच्या ३ हजार ६७७ वरून प्रस्तावित ३ हजार ७०२ करण्यात आली आहे. नागरिकांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून १९५० हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. हा क्रमांक सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे.

तसेच नागरिकांनी ECINET अॅपमधील ‘Book a Call With BLO’ या सुविधेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नवमतदारांनी संधी दवडू नये

१ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकास किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी नमुना ६ भरून मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व पात्र मतदार तसेच Uncollectable वर्गवारीतील नागरिकांनी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे दावे व हरकती दाखल कराव्यात, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. नवमतदारांनी मतदार म्हणून नोंदणी करून लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

निर्णयाविरुद्ध अपीलाचीही तरतूद

मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम २४(अ) अंतर्गत जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे अपील करता येणार आहे. तसेच पहिल्या अपीलीय प्राधिकरणाच्या निर्णयाविरुद्ध कलम २४(ब) नुसार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे दुसरे अपील दाखल करता येणार आहे.