व्हॉईस ऑफ मीडिया’च्या लढ्याला मोठे यश ; पत्रकारांच्या एसटी प्रवास सवलतीचा प्रश्न अखेर मार्गी; परिवहन मंत्र्यांचे तातडीने आदेश ;

मुंबई : अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून मिळणारी १०० टक्के मोफत प्रवासाची सवलत एनसीएमसी कार्डच्या नव्या यंत्रणेत उपलब्ध होत नसल्याने निर्माण झालेल्या गंभीर अडचणीची परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी तातडीने दखल घेतली असून, पत्रकारांची प्रवास सवलत सुरू करण्यासाठी संबंधित यंत्रणेत आवश्यक दुरुस्ती करून सिस्टीम अपडेट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यभरातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मोठा दिलासा मिळाला असून, व्हॉईस ऑफ मीडिया,व्हीओएम इंटरनॅशनल फोरमच्या अवघ्या एका दिवसाच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.
एनसीएमसी कार्डसाठी वापरण्यात येणाऱ्या नव्या मशीनमध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना लागू असलेली १०० टक्के मोफत प्रवासाची सवलत समाविष्ट नसल्याने राज्यातील अनेक पत्रकारांना एसटीमधून प्रवास करताना पूर्ण तिकीट काढावे लागत होते. नव्या यंत्रणेतील या तांत्रिक त्रुटीमुळे पत्रकार आणि एसटीचे चालक-वाहक यांच्यात गैरसमज आणि वाद निर्माण होत असल्याच्या तक्रारीही राज्यभरातून प्राप्त झाल्या होत्या. पत्रकारांना त्यांच्या हक्काच्या प्रवास सवलतीपासून वंचित ठेवणारी ही परिस्थिती तातडीने दूर करावी, अशी मागणी व्हॉईस ऑफ मीडिया, व्हीओएम इंटरनॅशनल फोरमने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती.
पत्रकारांसाठी पर्यायी एनसीएमसी कार्ड उपलब्ध होण्यासाठी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची परिस्थिती असताना, तोपर्यंत अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनी पूर्ण तिकीट काढून प्रवास करायचा का, असा थेट सवाल व्हॉईस ऑफ मीडियाने प्रशासनासमोर उपस्थित केला होता. कार्डची प्रक्रिया सुरू होण्यासाठी सुमारे १५ दिवस आणि त्यानंतर कार्ड प्रत्यक्ष मिळण्यासाठी आणखी सुमारे ४५ दिवस लागणार असल्याने या कालावधीत पत्रकारांना त्यांच्या प्रवास सवलतीपासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले होते.
व्हॉईस ऑफ मीडियाने गुरुवारी परिवहन मंत्र्यांच्या कार्यालयात निवेदन सादर करून एनसीएमसी कार्ड आणि यंत्रणेतील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करण्याबरोबरच पत्रकारांना लागू असलेली १०० टक्के मोफत प्रवासाची सवलत सिस्टीममध्ये समाविष्ट करून ती अपडेट करण्याची मागणी केली. सिस्टीम अपडेट होईपर्यंत पूर्वीच्या कार्डच्या आधारे अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना १०० टक्के मोफत प्रवासाची सवलत सुरू ठेवण्याबाबत राज्यातील सर्व आगार व्यवस्थापकांमार्फत चालक-वाहकांना स्पष्ट सूचना देण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली होती. प्रत्येक चालक आणि वाहकाला या आदेशाची माहिती झाली आहे, याची खात्री करण्याची जबाबदारी आगारप्रमुखांवर सोपवावी, जेणेकरून पत्रकार आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये अनावश्यक वाद निर्माण होणार नाहीत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले होते. मंत्री यांची ही भेट घेतली होती.
पत्रकारांना बातम्यांचे संकलन, अपघात, नैसर्गिक आपत्ती, सामाजिक प्रश्न, शासनाच्या योजना तसेच जनतेच्या विविध समस्या यांचे वार्तांकन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात सातत्याने प्रवास करावा लागतो. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत एसटी ही पत्रकारांसाठी अत्यंत महत्त्वाची प्रवास व्यवस्था आहे. त्यामुळे प्रवास सवलत बंद झाल्यास पत्रकारांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत होता. या पार्श्वभूमीवर पत्रकारांची सवलत तातडीने पूर्ववत करणे आवश्यक असल्याची भूमिका व्हॉईस ऑफ मीडियाने घेतली होती.
दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या तक्रारीची तातडीने दखल घेत संबंधित यंत्रणेला आवश्यक तांत्रिक दुरुस्ती करून सिस्टम अपडेट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे एनसीएमसीच्या नव्या यंत्रणेमुळे निर्माण झालेली पत्रकारांच्या प्रवास सवलतीची अडचण दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिवहन मंत्र्यांच्या या निर्णयामुळे राज्यभरातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यासोबतच अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बससेवांमध्ये प्रवास सवलत लागू करण्याची मागणीही व्हॉईस ऑफ मीडियाने केली आहे. स्लीपर कोच, पुणे-मुंबई-नाशिक मार्गावरील शिवनेरी, शिवाई, विद्युत बस तसेच इतर प्रीमियम सेवांमध्येही पत्रकारांना १०० टक्के प्रवास सवलत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आधुनिक आणि जलद बससेवा उपलब्ध असताना पत्रकारांना केवळ काही विशिष्ट बससेवांपुरती प्रवास सवलत मर्यादित ठेवणे योग्य नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
पत्रकारांच्या एसटी प्रवास सवलतीचा प्रश्न समोर येताच व्हॉईस ऑफ मीडियाने तातडीने प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि अवघ्या एका दिवसात परिवहन मंत्र्यांनी या प्रश्नाची दखल घेत सिस्टीम अपडेट करण्याचे आदेश दिल्याने संघटनेच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. पत्रकारांच्या हक्कांसाठी केवळ निवेदन देऊन न थांबता प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा करण्याची भूमिका व्हॉईस ऑफ मीडियाने पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
“कार्ड द्या; मात्र कार्ड मिळेपर्यंत पत्रकारांची प्रवास सवलत बंद करू नका. तांत्रिक अडचणीमुळे अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना त्यांच्या हक्काच्या सुविधेपासून वंचित ठेवता येणार नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने दखल घेऊन सिस्टीम अपडेट करण्याचे आदेश दिल्याबद्दल व्हॉईस ऑफ मीडिया त्यांचे आभार मानते. पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी यापुढेही संघटना सातत्याने पाठपुरावा करेल,” अशी भूमिका व्हॉईस ऑफ मीडिया,व्हीओएम इंटरनॅशनल फोरमने व्यक्त केली.
व्हॉईस ऑफ मीडिया,व्हीओएम इंटरनॅशनल फोरमचे संस्थापक व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया, नरेंद्र देशमुख, अजितदादा कुंकूलोळ या सह सर्व पदाधिकारी सदस्य यांनी परिवहन मंत्र्याचे आभार मानले आहेत. पत्रकारांच्या प्रवास सवलतीचा प्रश्न तातडीने मार्गी लावल्याने राज्यातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांमध्ये समाधान व्यक्त होत असून, व्हॉईस ऑफ मीडियाच्या पाठपुराव्याचे हे आणखी एक महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे.