धावत्या रेल्वेगाडीत दिवा लावून पूजा करणाऱ्या प्रवाशावर कठोर कारवाई ;

 
गाडीत ज्वलनशील वस्तू बाळगणे किंवा दिवा लावणे हा गुन्हा आहे - दोषींना दंड आणि ५ वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते 

भुसावळ (प्रतिनिधी)- धावत्या गाडीत दिवा लावून प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या एका प्रवाशावर मध्य रेल्वेने कठोर कारवाई केली आहे.

दिनांक ३१.०८.२०२६ रोजी, गाडी क्रमांक 12782 हजरत निजामुद्दीन - म्हैसूर एक्सप्रेस च्या कोच ए-१ मधील बर्थ क्रमांक १७ वर एका प्रवाशाने दिवा लावून पूजा केल्याबाबत भुसावळ येथील कमर्शियल कंट्रोलकडून माहिती मिळाली.

    खंडवा येथील कर्तव्यावर असलेल्या तिकीट तपासनीस रमण कुमार शर्मा यांनी या घटनेची माहिती दिली. पुढील आवश्यक कारवाईसाठी त्या प्रवाशाला भुसावळ रेल्वे स्थानकावर गाडीतून खाली उतरवण्यात आले. चौकशीदरम्यान, गरिबा (वय ५५ वर्षे, रा. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) असे ओळख पटलेल्या त्या प्रवाशाने सांगितले की, सायंकाळची प्रार्थना करताना त्याने आपल्या आरक्षित बर्थवर दिवा लावला होता. कर्तव्यावर असलेल्या टीटीइ ने त्याला दिवा विझवण्याचा सल्ला दिला होता आणि समजावून सांगितले होते की, उघड्या ज्योतीमुळे आग लागू शकते आणि प्रवाशांच्या तसेच रेल्वेच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, त्या प्रवाशाने प्रार्थना पूर्ण झाल्यानंतरच दिवा विझवण्याचा आग्रह धरला. टीटीइ ने आपल्या मोबाईल फोनवर या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले होते.
त्याच्याकडून आगपेटी, पितळी दिवा आणि स्टीलचा डबा जप्त करण्यात आला.

ही कृती प्रवाशांच्या आणि रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी संभाव्य धोका निर्माण करणारी असल्याने, दिनांक ०१.०९.२०२६ रोजी रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १५३ आणि १४५(ब) अन्वये आरोपीवर कारवाई करण्यात आली. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, आरोपीला भारतीय न्याय संहिता च्या कलम ३५(क) अन्वये नोटीस देऊन सोडण्यात आले.

मध्य रेल्वे सर्व प्रवाशांना आवाहन करते की त्यांनी गाडीत कोणत्याही ज्वलनशील वस्तू बाळगू नयेत किंवा दिवे, मेणबत्त्या किंवा अगरबत्ती लावू नयेत; कारण यामुळे आग लागू शकते आणि हजारो प्रवाशांचे प्राण धोक्यात येऊ शकतात. 
अशा कृत्यांसाठी 'रेल्वे कायदा' (The Railways Act) अन्वये खालीलप्रमाणे शिक्षा होऊ शकते:
कलम १४५(B) अन्वये - रेल्वे परिसराबाहेर काढणे, पास/तिकीट जप्त करणे आणि १,००० रुपयांपर्यंत दंड; तसेच ताकीद देऊनही गुन्हा केल्यास ६ महिन्यांपर्यंत कारावास किंवा ५,००० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच,
कलम १५३ अन्वये - ५ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.