भुसावळ (प्रतिनिधी) : अनेक तासांपासून सुमारे १०० फुट दूर दलदलयुक्त आणि अरुंद काँक्रीटच्या गटारात अडकून मृत्यूशी झुंज देत असलेल्या गोमातेची थरारक सुटका करण्यात गोसेवकांना अखेर यश आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवाची पर्वा न करता गोसेवकांनी दाखविलेल्या धाडसामुळे उपस्थितांनी “जय श्रीराम... जय गोमाता...” असा जयघोष करीत आनंदोत्सव साजरा केला. घटनेची माहिती मिळताच गोसेवक रोहित महाले यांनी क्षणाचाही विलंब न लावता गोमातेच्या बचावासाठी गटाराच्या दिशेने धाव घेतली. गटारात मोठ्या प्रमाणावर दलदल असल्याने त्यांचे पाय वारंवार रुतत होते. मात्र, कोणतीही भीती न बाळगता आणि हिंमत न हारता त्यांनी अडकलेल्या गोमातेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. बचावकार्या दरम्यान बलाढ्य काँक्रीटचे गटार फोडण्यात आले. त्यानंतर गोमाता सुमारे १० फुट पुढे सरकली. मात्र, अजूनही तब्बल ९० फुटांचे अंतर बाकी होते. अशा कठीण परिस्थितीतही गोसेवकांनी पुन्हा एकदा वेगाने प्रयत्न सुरू ठेवले. पुढील टप्प्यात गोमाता सुमारे ५० फुट अंतरावर आली. शेवटच्या निर्णायक प्रयत्नात जीवाची बाजी लावत गोसेवकांनी गटारातून अंतिम बचावकार्य पूर्ण केले आणि मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या गोमातेला सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळविले. गोमातेची सुटका होताच उपस्थित गोभक्तांनी “जय श्रीराम, जय गोमाता” असा गजर करीत आनंदाने जल्लोष केला. अनेकांनी या थरारक आणि भावनिक क्षणाचा आनंद व्यक्त करीत गोसेवकांच्या धाडसाचे कौतुक केले. या यशामागील प्रेरणेबाबत विचारले असता गोसेवक रोहित महाले यांनी सांगितले की, कडक उपवास व गुरुवर्य श्री. मिलिंद एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यकामाची प्रेरणा मिळते. “सत्यकाम हे देवांचे काम आहे, ते केलेच पाहिजे,” या विचाराने आम्ही कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या धाडसी बचावकार्यात रोहित महाले, आदित्य धायडे, कुणाल शिंदे, वैभव नेहते, निलेश पाटील, किरण वारके, महेंद्र सोनुजी, वस्ताद विश्वकर्मा तसेच समस्त गोभक्तांनी मोलाचे योगदान दिले. “सत्यकाम हे देवांचे काम आहे, ते केलेच पाहिजे... सत्यकाम गोरक्षाधाम!” या भावनेतून झालेल्या या धाडसी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


