खिर्डी बुद्रुक येथील मोटारसायकल चोरीचा उलगडा; ७० हजारांची दुचाकी जप्त ; संशयित आरोपी अटकेत; गावातील इतर चोरीच्या घटनांतील सहभागाचाही पोलिसांकडून तपास :

रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथील रहिवासी व हॉटेल व्यावसायिक प्रवीण रमेश जैस्वाल यांची घरासमोरून चोरीस गेलेली होंडा युनिकॉर्न मोटारसायकल निंभोरा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत हस्तगत केली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी किरण उर्फ गफूर पीतांबर कोळी (रा. खिर्डी बु., ता. रावेर) यास ताब्यात घेण्यात आले असून, न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण रमेश जैस्वाल यांनी दि. २९ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजेच्या सुमारास आपली होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (क्र. MH 19 EX 2679) घरासमोर पार्क केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी मोटारसायकल चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी तपास तीव्र केला. दरम्यान, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी किरण उर्फ गफूर पीतांबर कोळी यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या ताब्यातून सुमारे ७० हजार रुपये किमतीची चोरीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर व सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. रिजवान पिंजारी, पोहेकॉ. किरण चाटे, पोकॉ. सुभाष शिंदे व पोकॉ. सरफराज तडवी यांच्या पथकाने केली.

दरम्यान, खिर्डी बुद्रुक परिसरात यापूर्वी विविध प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्याची चर्चा असून, त्या घटनांमध्येही या संशयित आरोपीचा काही सहभाग आहे का, याचा कसून तपास निंभोरा पोलीस करीत आहेत. या तपासातून आणखी काही चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, याबाबत गावात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.सदर संशयीत आरोपी माजी लोकनियुक्त सरपंच असल्याने याचोरी प्रकरणाकडे ग्रामस्थांची लक्ष लागले आहे....!