भुसावळ (प्रतिनिधी) : स्थानिक पु. ओं. नाहाटा महाविद्यालयातील विशाखा समितीच्या वतीने युवतींसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध समोपदेशक आरती सारंग चौधरी यांनी ‘आजची युवती : सजग, सुरक्षित आणि सक्षम’ या विषयावर विद्यार्थिनींना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. “गुलाब बनून काट्यांसोबत जगण्यापेक्षा, वाघीण बनून स्वतःचे रक्षण करायला शिका,” असा कडक संदेश देत त्यांनी युवतींना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर खंबीर, सजग आणि आत्मविश्वासाने उभे राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या पर्यवेक्षक प्रा. स्वाती पाटील या होत्या. व्याख्यानादरम्यान समोपदेशक आरती चौधरी यांनी सजगता, सुरक्षितता आणि सक्षमता या तीन महत्त्वपूर्ण सूत्रांवर विविध उदाहरणांसह सविस्तर प्रकाश टाकला. डिजिटल सजगता आणि सायबर सुरक्षेवर भर सोशल मीडियावर स्वतःचे फोटो अपलोड करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. वैयक्तिक माहिती व छायाचित्रांचा गैरवापर होऊ शकतो, त्यामुळे सायबर जगतात सजग राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सायबर बुलिंग अर्थात इंटरनेटवरील छळवणुकीला बळी पडू नये, ऑनलाइन पेमेंट करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच इंटरनेटवर स्वतःच्या मर्यादा सांभाळण्याचे ज्ञान प्रत्येक युवतीला असणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य, हक्क आणि कायद्यांची माहिती आवश्यक प्रत्येक महिलेला आपल्या हक्कांशी संबंधित कायद्यांची माहिती असणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगताना त्यांनी आरोग्याबाबतही जागरूक राहण्याचे आवाहन केले. फास्ट फूडचे प्रमाण कमी करून सकस आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि निरोगी जीवनशैली स्वीकारणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. संकटात घाबरू नका; आत्मसंरक्षणासाठी सज्ज राहा रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्याने एकटे जाणे टाळावे, तसेच अचानक संकट उद्भवल्यास घाबरून न जाता धैर्याने त्याचा सामना करावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले. संभाव्य धोक्याची परिस्थिती ओळखणे, मदतीसाठी तत्काळ संपर्क करणे आणि शक्य तितक्या सुरक्षित ठिकाणी जाणे याबाबत त्यांनी विद्यार्थिनींना जागरूक केले. आपल्या मनाची ‘सहावी जाणीव’ (6th Sense) अनेकदा धोक्याचे संकेत देत असते. त्यामुळे कोणत्याही व्यक्ती किंवा परिस्थितीतील ‘रेड फ्लॅग्स’ वेळीच ओळखून अनावश्यक धोका पत्करू नये, असा महत्त्वपूर्ण सल्लाही त्यांनी दिला. ‘नाही’ म्हणण्याची हिंमत ठेवा जी गोष्ट आपल्याला आवडत नाही किंवा पटत नाही, तिला स्पष्टपणे ‘नाही’ म्हणण्याची हिंमत प्रत्येक युवतीमध्ये असायला हवी, असे आरती चौधरी यांनी सांगितले. स्वतःच्या मर्यादा आणि निर्णय यांचा आदर करण्यास इतरांना शिकविणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. आर्थिक सक्षमता ही काळाची गरज कोणावरही पूर्णपणे अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक स्वावलंबन आणि आर्थिक साक्षरता अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणासोबतच आर्थिक नियोजन, बचत आणि स्वतःची आर्थिक क्षमता विकसित करण्याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थिनींना पटवून दिले. संकटकाळात हेल्पलाईनचा वापर करा संकटकाळात मदतीसाठी १०९१ (भरोसा सेल) तसेच आपत्कालीन मदतीसाठी ११२ या हेल्पलाईन क्रमांकांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. आपला मोबाईल फोन नेहमी चार्ज ठेवणे आणि गरजेच्या वेळी विश्वासू व्यक्तींशी संपर्क साधणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. व्याख्यानाच्या शेवटी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांनी दिलेल्या शिक्षण व संस्कारांचा उपयोग चांगल्या कार्यासाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी करण्याचे आवाहन आरती चौधरी यांनी केले. “आपल्या पंखांना बळ द्या आणि प्रत्येक युवतीने सजग, सुरक्षित व सक्षम बनावे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात विशाखा समितीच्या चेअरमन प्रा. नम्रता महाजन यांनी प्रास्ताविकातून केली. त्यांनी विशाखा समितीच्या कार्याची माहिती देत या विशेष व्याख्यानामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन प्रा. जयश्री येवले यांनी केले. व्याख्यानाच्या शेवटी विशाखा समितीच्या सदस्या डॉ. सौ. भाग्यश्री भंगाळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील इतर प्राध्यापकांसह मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा. वाय. एम. पाटील व प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांचे मार्गदर्शन लाभले.


