भुसावळमध्ये प्रथमच BSARAतर्फे शेगाव रन वारीचे आयोजन ; ११९ कि.मी.ची भक्तिमय रिले रन १५ तासांत पूर्ण; सहा धावपटूंचा सहभाग ;

 

भुसावळ (प्रतिनिधी ) -  भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन (BSARA) तर्फे भुसावळमध्ये प्रथमच ‘भुसावळ ते शेगाव रन वारी’ या अभिनव रिले रनचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या पावन दिवशी, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी नहाटा चौफुली, भुसावळ येथून सुमारे ४.१५ वाजता या रन वारीला सुरुवात झाली. रात्रभर टप्प्याटप्प्याने धावत ही रिले दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ९ वाजता शेगाव येथे पोहोचली. अशाप्रकारे सुमारे ११९ कि.मी.चा प्रवास १५ तासांत पूर्ण करण्यात आला.

या रिले रनमध्ये श्री. प्रविण वारके, श्री. मनोज चौधरी, श्री. विश्वनाथ पावरा आणि श्री. जगदीश रेहपाडे या चौघांनी मुख्य रिले टीम म्हणून टप्प्याटप्प्याने धावत एकमेकांना रिले सोपवत भुसावळ ते शेगावचा प्रवास पूर्ण केला. त्यांना श्री. युवराज सूर्यवंशी आणि श्री. मधुकर इंगळे यांनी विविध टप्प्यांवर स्वतः धावत मोलाची साथ दिली. या दोघांनी या प्रवासादरम्यान आपले वैयक्तिक रनिंग रेकॉर्डही नोंदवले.

या रन वारीत सहभागी धावपटूंची वैयक्तिक कामगिरीही उल्लेखनीय ठरली. प्रविण वारके सर – ४६ कि.मी., युवराज सूर्यवंशी – ५५ कि.मी., मधुकर इंगळे – ४० कि.मी., मनोज चौधरी – २५ कि.मी., विश्वनाथ पावरा – ३० कि.मी. आणि जगदीश रेहपाडे – ३० कि.मी. अशा प्रकारे प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार विविध टप्प्यांवर योगदान दिले.

पाटील यांचा सायकलवरून सतत सपोर्ट

रनिंग ग्रुपसोबत श्री. मनोहर पाटील साहेब यांनी सायकलवरून संपूर्ण मार्गावर साथ देत सुरक्षा, आवश्यक मदत आणि सपोर्टची जबाबदारी सांभाळली. रात्रीच्या प्रवासात रनर्सच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांची साथ महत्त्वपूर्ण ठरली.

फालक सरांचे नियोजन व मार्गदर्शन ठरले महत्त्वाचे

या संपूर्ण रन वारीच्या यशामागे श्री. प्रविण फालक सरांचे मार्गदर्शन आणि नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरले. योग्य वेळी हायड्रेशन व न्यूट्रिशनची व्यवस्था, रनर्सचे टप्पे व टीम बदल, प्रत्येक टप्प्याचे नियोजन, रस्त्यावरील सुरक्षितता आणि रनर्सला सातत्याने प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले.

विशेष म्हणजे, रात्रभर विश्रांती न घेता कारमधून रनर्ससोबत राहून त्यांनी सतत सुरक्षा व मार्गदर्शन केले. थकलेल्या रनरला योग्य वेळी प्रोत्साहन देणे आणि परिस्थितीनुसार पुढील रनरची निवड करणे, यामुळे संपूर्ण रिले सुरळीतपणे पुढे सरकली.

शेवटचे पाच किलोमीटर ठरले भावनिक

शेगाव मंदिरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतर बाकी असताना सर्व सहभागी रनर्स व सपोर्ट टीमने एकत्रित ग्रुप रन करत अंतिम टप्पा पूर्ण केला. रात्रभराचा थकवा, लांबचा प्रवास आणि शारीरिक आव्हाने मागे टाकत सर्वांनी एकत्रितपणे शेगाव नगरीत प्रवेश केला.

‘रनर्स बदलले, टप्पे बदलले, थकवा आला; मात्र रिले थांबली नाही’, हीच या उपक्रमाची खरी भावना ठरली. भक्ती, जिद्द, शिस्त आणि टीमवर्क यांच्या जोरावर पूर्ण झालेली ही रन वारी श्री गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करण्यात आली.

BSARA तर्फे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या शेगाव रन वारीत सहभागी सर्व रनर्स, श्री. मनोहर पाटील , श्री. प्रविण फालक सर तसेच संपूर्ण सपोर्ट टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.

“जिथे श्रद्धा असते, तिथे पाय थांबत नाहीत; जिथे टीम असते, तिथे अशक्य काहीच नसते आणि जिथे गजानन महाराजांची कृपा असते, तिथे प्रत्येक पाऊल शेगावच्या दिशेनेच पडते.”