भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रवाशांसाठी सुविधाजनक करण्याच्या दृष्टीने भुसावळ बस आगाराच्या आधुनिकीकरणाचे (बस पोर्ट) काम शासन निधीतून मंजूर झाले आहे. मात्र, मंजुरी होऊनही प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नसल्याने या कामाला तातडीने गती देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच भुसावळ तालुक्यासाठी ई-बस सेवा सुरू करणे तसेच शहरात उपलब्ध असलेल्या जागेवर ई-बस चार्जिंग स्टेशन उभारण्याचा विषयही प्रलंबित आहे. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री. प्रतापजी सरनाईक आणि वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजयभाऊ सावकारे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भुसावळ बस स्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच भुसावळ तालुक्यातील नागरिक व प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेता ई-बस सेवा सुरू करण्याची आवश्यकता परिवहन मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. शहरात ई-बस चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी जागा उपलब्ध असल्याने त्याबाबतही सकारात्मक निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात यावी, अशी भूमिका मांडण्यात आली. आधुनिक आणि पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दृष्टीने ई-बस सेवा भुसावळसाठी महत्त्वाची ठरणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. भुसावळची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आधुनिक करणे हा केवळ सुविधांचा विषय नसून विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार तसेच दररोज प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीशी निगडित प्रश्न आहे. त्यामुळे बस पोर्टचे रखडलेले काम, ई-बस सेवा आणि चार्जिंग स्टेशन या प्रलंबित बाबींना गती देऊन लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्याच्या दृष्टीनेही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे भुसावळच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आगामी काळात आधुनिक रूप मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.



