भुसावळ विभागाकडून रेल्वे खानपान स्टॉलवरील जादा दर आकारणीच्या तक्रारींची गंभीर दखल; भुसावळसह जळगाव, अकोला आणि मनमाड स्थानकावरील ५ खानपान स्टॉल सात दिवसांसाठी तात्पुरते बंद ;

भुसावळ (प्रतिनिधी ) - भुसावळ विभागाद्वारे रेल्वे प्रवाशांकडून प्राप्त होणाऱ्या रेल मदत वरील खानपान स्टॉलद्वारे जादा दर आकारणीच्या वारंवार तक्रारींची विभागाने गंभीर दखल घेतली आहे. प्रवाशांना निर्धारित दराने दर्जेदार व स्वच्छ खानपान सुविधा उपलब्ध करून देणे तसेच प्रवाशांच्या हिताचे संरक्षण करणे यास विभागाकडून सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे.

जादा दर आकारणीच्या तक्रारींना आळा घालण्यासाठी तसेच इतर खानपान परवानाधारकांसाठी प्रतिबंधात्मक संदेश देण्याच्या उद्देशाने भुसावळ , जळगाव, अकोला  आणि मनमाड स्थानकांवरील एकूण ५ खानपान स्टॉल १८.०८.२०२६ ते २४.०८.२०२६ या कालावधीत ७ दिवसांसाठी तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.

संबंधित परवानाधारकांना बंद आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. जादा दर आकारणी किंवा तत्सम तक्रारींची पुनरावृत्ती झाल्यास लागू नियम व करारातील अटींनुसार अधिक कठोर कारवाई करण्यात येईल. यामध्ये खानपान परवाना/करार रद्द करण्याची कारवाई देखील करण्यात येऊ शकते.

याच अनुषंगाने भुसावळ विभागाकडून ऑनलाइन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, भुसावळ यांनी ६० हून अधिक खानपान परवानाधारकांना खानपान सेवेबाबतच्या निर्धारित नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीदरम्यान जादा दर आकारणी, स्वच्छता, स्वच्छतागृह व खाद्यपदार्थांची स्वच्छता, हायजिन, निर्धारित दरपत्रकाचे पालन तसेच प्रवाशांना ग्राहकाभिमुख सेवा देणे यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

भुसावळ विभागाने सर्व खानपान परवानाधारकांना निर्धारित दर, खानपानाशी संबंधित नियम व मानके आणि प्रवाशांसाठी अनुकूल सेवा पद्धती यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

भुसावळ विभाग प्रवाशांच्या तक्रारींबाबत संवेदनशील असून, रेल मदद द्वारे प्राप्त तक्रारींवर तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. प्रवाशांनी खानपान स्टॉलवर निर्धारित दरापेक्षा जादा रक्कम आकारल्यास किंवा स्वच्छता व गुणवत्तेबाबत काही त्रुटी आढळल्यास रेल मदद द्वारे तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागाने केले आहे.

प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ, पारदर्शक आणि निर्धारित दरानुसार खानपान सेवा उपलब्ध करून देणे ही भुसावळ विभागाची प्राथमिकता आहे.