स्वातंत्र्य दिनानिमित्त GNRF चा स्तुत्य उपक्रम; भव्य रक्तदान शिबिर संपन्न ; ५० हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान

भुसावळ (प्रतिनिधी) - स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दावते इस्लामी इंडिया यांच्या सामाजिक विभाग GNRF (गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन) यांच्या वतीने भुसावळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन भुसावळ बाजार पोलीस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक निवांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी परवेज शेख, नगरसेवक आसिफ खान उर्फ मक्का भाई तसेच फिरोज शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिबिरात ५० हून अधिक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून गरजू रुग्णांच्या मदतीसाठी आपले योगदान दिले. रक्तदानापूर्वी रक्तदात्यांची आवश्यक आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच संपूर्ण प्रक्रियेत स्वच्छता व सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी GNRFच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्यासाठी रक्तदानाचे महत्त्व मोठे असल्याचे त्यांनी सांगितले.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी दावते इस्लामी इंडिया जिल्हाध्यक्ष जुबेर अत्तारी, अब्दुल सईद शेख, सय्यद साबीर, खालिद अत्तारी, फरीद शेख, शोएब अत्तारी, युसूफ खान, अफसर सर तसेच GNRF जिल्हाध्यक्ष रफीक रोशन कादरी यांच्यासह कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले.आयोजकांनी सर्व रक्तदाते, मान्यवर आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.