नाशिक - नाशिकमध्ये बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव परिसरातील एका खासगी बंगल्यात बनावट नोटा तयार करण्याचे काम सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी कारवाई करत पाच जणांना अटक केली असून, मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा, छपाईसाठी लागणारे साहित्य आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात संशयीत अमरेश्वर आईथा, मच्छिंद्र घनदाट, हिरामण दाते, गोकुळ दाते आणि दासरी सत्यइ या पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी बनावट नोटांच्या माध्यमातून मोठ्या आर्थिक व्यवहाराचा प्रयत्न करत असल्याचा संशय असून, या रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. हे रॅकेट केवळ नाशिकपुरते मर्यादित आहे की त्याचे धागेदोरे राज्याबाहेर किंवा देशातील इतर भागांपर्यंत पोहोचले आहेत, याचाही तपास सुरू आहे. आरोपींचे संपर्क, आर्थिक व्यवहार आणि बनावट नोटांचा संभाव्य पुरवठा याबाबत पोलिसांकडून माहिती गोळा केली जात आहे. नाशिकसारख्या शहरात एका बंगल्यात अशा प्रकारे बनावट नोटांची निर्मिती सुरू असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे बनावट नोटांच्या रॅकेटला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची तपासणी आणि आरोपींची चौकशी सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, बनावट नोटा कुठे आणि किती प्रमाणात पाठवल्या जात होत्या आणि या व्यवहारामागील मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा उलगडा तपासातून होण्याची शक्यता आहे.


