रावेर : रोझोदा येथील ४८ वर्षीय बेकरी व्यावसायिक यशवंत भानुदास ठाकुर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या प्रकरणी त्यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून संशयीत राहूल नामदेव लिधुरे (रा. रोझोदा) आणि धर्मेंद्र किंसनचंद तलरेजा (रा. फैजपूर) यांच्याविरुद्ध सावदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, यशवंत ठाकुर यांनी राहूल लिधुरे यांच्याकडून दोन लाख रुपये, तर धर्मेंद्र तलरेजा यांच्याकडून सहा लाख रुपये घेतले होते. या रकमेपोटी अनुक्रमे ४ लाख ५० हजार रुपये आणि ९ लाख रुपये व्याज दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. कर्जाची परतफेड करूनही व्याजाच्या पैशांसाठी वारंवार तगादा लावला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ११ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजता बेकरी बंद करून यशवंत ठाकुर यांचा मुलगा दुष्यंत व त्यांच्या आईसह घरी परतले. घरात गेल्यानंतर यशवंत ठाकुर हे स्वयंपाकघरातील छताच्या पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. कुटुंबीयांनी त्यांना खाली उतरवून उपचारासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक १८/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली. चौकशीदरम्यान घरातून कथित आत्महत्येची चिठ्ठी पोलिसांना मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. या चिठ्ठीत व्यावसायिक नुकसान, आर्थिक अडचणी आणि व्याजाच्या पैशांसाठी होत असलेल्या मानसिक त्रासाचा उल्लेख असल्याचे तक्रारीत नमूद आहे. चिठ्ठीत संबंधित दोघांची नावे व मोबाईल क्रमांकही नमूद असल्याचा दावा करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्ती बेकरीमध्ये येऊन ग्राहकांसमोर व्याजाच्या पैशांची मागणी करीत तसेच जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित करीत असल्याचा आरोप आहे. यशवंत ठाकुर मागील काही दिवसांपासून तणावाखाली होते. मोबाईल फोन वाजल्यानंतरही त्यांना भीती वाटत असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, मागील महिन्यातही यशवंत ठाकुर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ते तणावाखाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोप हे तक्रारदाराने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीतील माहितीनुसार आहेत. आरोपांची सत्यता तसेच आत्महत्येच्या कारणांचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. प्रकरणाचा पुढील तपास नांदराज दिनकरराव पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे.


