जिल्हा परिषद शाळा गुणवत्तापूर्ण; त्या टिकविणे ही सर्वांची जबाबदारी — बी. व्ही. गायकवाड

भुसावळ (प्रतिनिधी)- उपदेश फाउंडेशन, भुसावळ यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काहुरखेडे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त अकाऊंट ऑफिसर बी. व्ही. गायकवाड होते. शैक्षणिक साहित्याचे दाते दीपनगर येथील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर चंद्रकांत सपकाळे होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दुरेघी, चौकटी, चौरेघी मिक्स वह्या, ‘मी वाचणारच’ इंग्रजी उजळणी पुस्तक, ‘मूलभूत गणित व १ ते १०० संख्या वाचन-लेखन उपक्रम’ उजळणी पुस्तक, ‘१९ खडी मी वाचणारच’ उजळणी पुस्तक आदी शैक्षणिक साहित्य देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना चंद्रकांत सपकाळे, सुरेंद्र रामटेके, यशराज हंबर्डीकर व उपदेश फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना बी. व्ही. गायकवाड म्हणाले की, “जिल्हा परिषद शाळा या गुणवत्तापूर्ण आहेत. या शाळांमधील शिक्षक उच्चशिक्षित असून डी.एड. व बी.एड. पदवीधारक आहेत. त्यामुळे गावातील पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश द्यावा आणि या शाळा बंद होण्यापासून टिकविण्यासाठी पुढाकार घ्यावा.”

जिल्हा परिषद शाळा बंद झाल्यास गोरगरीब, शेतकरी व मजूर कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होईल. आम्ही अनेक पदाधिकारी व विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले व्यक्ती जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन आज उच्च पदांवर कार्यरत आहोत. त्यामुळे या शाळांचे महत्त्व मोठे आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.

“शैक्षणिक साहित्य वाटपामागे कोणताही स्वार्थ नसून गोरगरीब व गरजू पालकांच्या मुलांनी शिक्षण घ्यावे, शाळेत टिकावे आणि शिक्षणाच्या माध्यमातून उच्च पदांवर पोहोचावे, हाच या उपक्रमामागील उद्देश आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमास उपदेश फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक शिंदे, उपाध्यक्ष संदेश शिंदे,सदस्य रेल्वे गार्ड आर. एस. वानखेडे, सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी बी. एस. नरवाडे, रेल्वे तिकीट कंडक्टर सुरेंद्र रामटेके,  एमएसईबी साकेगाव ऑपरेटर यशराज हंबर्डीकर, सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी गौतम निकम यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक समाधान जाधव यांनी केले. प्रास्ताविक उपाध्यक्ष संदेश शिंदे यांनी केले, तर आभार मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षिका ममता तडवी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, निलेश पाटील, गजानन पाटील, विनोद धनगर, वामन सपकाळे, आकाश पाटील, गोकुळ पाटील, धीरज पाटील तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.