भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील मुस्लिम कॉलनी परिसरात राहणाऱ्या किन्नरावर घरात घुसून मारहाण करत चाकूने हल्ला केल्याची घटना रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या प्रकरणी अर्षद, बाबा काल्या व त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध भुसावळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुस्कान अतुल पांडे उर्फ दीपक वंशकार (वय २४, व्यवसाय भिक्षुकी, रा. प्लॉट नं. १२, मुस्लिम कॉलनी, बडी खानका मागे, भुसावळ) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. तक्रारदार आपल्या मैत्रिणी सौम्या यादव व रुक्षा सिंग यांच्यासह शमशाद इब्राहीम खान यांच्या घरात मागील सुमारे पाच महिन्यांपासून भाड्याने राहत आहेत. त्या भुसावळ ते रावेरदरम्यान रेल्वेत भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात. रेल्वेत काम करण्यास नकार दिल्याने वाद तक्रारीनुसार, रविवारी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास तक्रारदार घरात जेवण बनवत असताना अर्षद (पूर्ण नाव अज्ञात), बाबा काल्या (पूर्ण नाव अज्ञात) व त्यांच्यासोबत दोन अनोळखी तरुण घरात आले. यावेळी बाबा काल्याने तक्रारदारास रेल्वेत त्यांच्यासोबत काम करण्यास सांगितले. मात्र, त्यांनी नकार दिल्याने आरोपी संतापले. यानंतर आरोपींनी तक्रारदारास चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. अर्षद याने त्यांच्या डाव्या गालावर चाकूने वार केल्याने त्या जखमी झाल्या असून रक्तस्राव झाला. भांडण सोडविण्यासाठी पुढे आलेल्या सौम्या यादव यांनाही आरोपींनी मारहाण व शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच, “आमच्या रेल्वेत काम करा, अन्यथा जीवे ठार मारू,” अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. उपचारानंतर पोलिसांत तक्रार हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत तक्रारदार बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. पोलिसांनी त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी मेमो देऊन दवाखान्यात पाठविले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली. या प्रकरणी अर्षद, बाबा काल्या व त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल जुबेर तडवी करीत आहेत.


