भुसावळ प्रतिनिधी : युवक आणि विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांपासून दूर ठेवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या 'मिशन राईज' अभियानांतर्गत इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या अभियानांतर्गत ताप्ती पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल आणि बियाणी मिलिटरी स्कूल येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे गंभीर आरोग्यविषयक, सामाजिक तसेच मानसिक दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. नशेच्या आहारी गेल्यामुळे व्यक्तीच्या जीवनावर तसेच कुटुंब आणि समाजावर होणाऱ्या विपरीत परिणामांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी ना. आ. वस्त्रोद्योग मंत्री संजय वामन सावकारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी नशेपासून दूर राहून शिक्षण, शिस्त आणि सकारात्मक विचारसरणीचा अंगीकार करावा, असे आवाहन केले. मंत्री संजय सावकारे म्हणाले की, देशाचे भविष्य आजच्या विद्यार्थ्यांच्या हातात आहे. युवा पिढी नशेपासून दूर राहिली तर मजबूत, निरोगी आणि सक्षम समाजाची निर्मिती होऊ शकते. विद्यार्थ्यांनी स्वतः नशेपासून दूर राहण्याबरोबरच आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि परिसरातील नागरिकांनाही नशेच्या दुष्परिणामांबाबत जागरूक करावे, असेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी पोलीस विभागाचे अधिकारी, शाळा प्रशासन, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस अधिकाऱ्यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत नशेच्या विरोधात जनजागृती केली. तसेच नशामुक्त समाज घडविण्यात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. ताप्ती पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल आणि बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये राबविण्यात आलेल्या या अभियानातून विद्यार्थ्यांना नशेपासून दूर राहण्याचा आणि समाजात नशामुक्ती संदेश पोहोचविण्यासाठी नशेला ‘नाही’ म्हणा; शिक्षण आणि उज्ज्वल भविष्याला ‘हो’ म्हणा! हा संकल्प व संदेश देण्यात आला



