भुसावळात श्रीरामकथेत श्रीराम-जानकी विवाह सोहळ्याचा सजीव देखावा; मोहनजी महाराजांच्या निरूपणाने भाविक मंत्रमुग्ध


भुसावळ (प्रतिनिधी):
भुसावळ येथे रामकथा समितीच्या पावन तत्त्वावधानात आयोजित सात दिवसीय श्रीरामकथेच्या चौथ्या दिवशी पूज्य श्री मदन मोहनजी महाराज यांनी रामकथेचे रसाळ निरूपण करत भारतीय जीवनपद्धतीचा पाया वेदांवर आधारलेला असल्याचे प्रतिपादन केले. "भारतीय जीवनपद्धतीचा मूळ ग्रंथ वेद आहे आणि स्वतः वेदच रामायणात परिवर्तित झाले आहेत. वैदिक आणि पौराणिक विचारधारांमध्ये सेतू निर्माण करण्याचे कार्य रामचरितमानसने केले असून रामायण ही आपल्या जीवनाची आदर्श मनुसंहिता आहे," असे त्यांनी सांगितले.

कथेदरम्यान अहिल्या उद्धार प्रसंगाचे विवेचन करताना महाराज म्हणाले की, जीवनात कितीही मोठे दुःख आले तरी त्याला प्रभूचा प्रसाद मानून स्वीकारले पाहिजे. श्रद्धा, संयम आणि प्रेमाने परमेश्वराची प्रतीक्षा करणाऱ्याला निश्चितच ईश्वरप्राप्ती होते, असा संदेश त्यांनी दिला.

यानंतर मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम आणि जगज्जननी माता जानकी यांच्या विवाह प्रसंगाचे अत्यंत भावपूर्ण वर्णन करण्यात आले. श्रीराम-जानकी विवाहाचा सजीव देखावा सादर करण्यात आल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. उपस्थित भाविकांनी जयघोष करत या दिव्य सोहळ्याचा आनंद लुटला.

कथेदरम्यान "चोक पुराओ मंगल गाओ" यांसारख्या विविध रागांतील भजनांच्या सादरीकरणाने वातावरण अधिकच भक्तिरसात न्हाऊन निघाले. भजन आणि कथेच्या सुंदर संगमामुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.

यावेळी राधेश्याम लाहोटी, विना लाहोटी, जी. आर. ठाकूर, संजय चांडक, नगरसेवक परीक्षेत बऱ्हाटे, दिपाली बऱ्हाटे, बोधराज चौधरी, प्रिया चौधरी, राजेंद्र आवटे, उमेश नेमाडे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.