एका मित्राचा पाय घसरताच वाचविण्यासाठी गेलेले दोघेही खोल पाण्यात बुडाले; शहरावर शोककळा

एका मित्राचा पाय घसरताच वाचविण्यासाठी गेलेले दोघेही खोल पाण्यात बुडाले; शहरावर शोककळा अमळनेर (प्रतिनिधी): अमळनेर शहराला हादरवून टाकणारी अत्यंत दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी घडली. चोपडा रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळील खदाणीत सेल्फी काढण्याच्या मोहात तीन अल्पवयीन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिघे मित्र खदाणीतील बेटासारख्या उंचवट्यावर उभे राहून सेल्फी काढत होते. त्यावेळी एका मुलाचा पाय घसरून तो खोल पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी उर्वरित दोघेही धावले; मात्र पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अंदाज न आल्याने तिघेही सुमारे ३० फूट खोल पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर तिन्ही मुलांना पाण्याबाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या दुर्घटनेत मानव बंटी रतनानी (१४), कार्तिक विकी उधवानी (१४) आणि दिनेश विजय पंजवानी (१७) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिघेही अमळनेर शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी होते. या हृदयद्रावक घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण अमळनेर शहर शोकमग्न झाले आहे. परिसरातील नागरिकांनीही या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान, पावसाळ्यात खदाणी, तलाव, नदी तसेच इतर खोल पाण्याच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि सेल्फी काढण्याच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.


