आंतरराष्ट्रीय प्लास्टिक कॅरीबॅग मुक्ती दिनानिमित्त महिला पर्यावरण मंचाचा अभिनव उपक्रम१४ किलो प्लास्टिक कचरा ‘री-चरखा’ संस्थेकडे पुनर्वापरासाठी पाठविला ;

भुसावळ, दि. ३ ((प्रतिनिधी) -  आंतरराष्ट्रीय प्लास्टिक कॅरीबॅग मुक्ती दिनानिमित्त महिला पर्यावरण मंचातर्फे विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरण सख्या स्वतःच्या खर्चाने कापडी पिशव्या शिवून त्यांचे वाटप करत असून, भुसावळ शहरात "प्लास्टिक कॅरीबॅग नको गं बाई" या विषयावरील भारूड सादर करून नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत.

कापडी पिशव्यांच्या वापराबाबत जागृती करूनही घरामध्ये किराणा, फळे व भाजीपाला यांसोबत येणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे, हा प्रश्न महिला पर्यावरण मंचाच्या अध्यक्षा शालिनी वाडेकर यांना नेहमीच पडत होता. यावर उपाय म्हणून यापूर्वी घरातील प्लास्टिक कचऱ्यापासून 'इको ब्रिक्स' तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. या इको ब्रिक्सचा वापर झाडांसाठी आळे, गार्डनमधील टेबल तसेच इतर उपयुक्त वस्तू तयार करण्यासाठी करण्यात येतो.

यावर्षी आंतरराष्ट्रीय प्लास्टिक कॅरीबॅग मुक्ती दिनानिमित्त पर्यावरण सख्यांनी घरातील प्लास्टिक कचरा संकलित करून तो पुनर्वापरासाठी 'री-चरखा', पुणे या संस्थेकडे स्वतःच्या खर्चाने पाठविण्याचा उपक्रम हाती घेतला. या माध्यमातून प्लास्टिक कचऱ्यापासून विविध उपयुक्त वस्तू, विशेषतः बॅग तयार केल्या जाणार आहेत.

भुसावळमधील नागरिकांनीही आपल्या घरातील प्लास्टिक कचरा वेगळा जमा करून 'री-चरखा' संस्थेला दान करावा, असे आवाहन महिला पर्यावरण मंचातर्फे करण्यात आले आहे.

या उपक्रमात माधुरी चौधरी, सोनाली राणे, उषा काथार, मंजू सुरळकर, रंजना वराडे, जयश्री इंगळे, वंदना राखुंडे, सुरेखा चौधरी, माधुरी चौधरी आदी पर्यावरण सख्यांनी सहभाग घेतला. त्यांनी स्वतःच्या घरातील एकूण १४ किलो प्लास्टिक कचरा व्यवस्थित पॅकिंग करून पोस्टाद्वारे 'री-चरखा', पुणे येथे पाठविला.