भुसावळ ३ जुलै (प्रतिनिधी ) - भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक २३ मधील शिवशक्ती हुडको कॉलनीतील महिला नागरिकांनी पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येमुळे संतप्त होत शुक्रवार रोजी दुपारी नगरपालिकेवर धडक देत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. सदर निवेदन पालिका अधिकारी दिपक चौधरी यांनी स्वीकारले. कॉलनीतील रहिवाशांना नियमित, स्वच्छ व पिण्यायोग्य पाणीपुरवठा करण्यात यावा, तसेच विद्यमान दूषित पाणीपुरवठ्याची समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवशक्ती हुडको कॉलनीतील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसर अनेक मूलभूत समस्यांनी ग्रस्त असून त्यामध्ये सर्वात गंभीर समस्या म्हणजे पाणीपुरवठ्याची आहे. कॉलनीमध्ये दहा ते बारा दिवसांनी, तर काही वेळा तब्बल पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय, मिळणारे पाणी अस्वच्छ असून त्यामध्ये किडे, आळ्या तसेच घाण आढळून येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, कॉलनीला पाणीपुरवठा करणारी विद्यमान पाईपलाईन बलबल काशी नाल्यालगतून गेलेली असून, त्याच ठिकाणाहून जोडणी करण्यात आली आहे. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच हुडको परिसरातील जुन्या भूमिगत गटारवाहिन्या वारंवार तुंबत असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, सद्यस्थितीतील पाईपलाईन काढून इतर सुरक्षित ठिकाणी असलेल्या जलवाहिनीमधून नव्याने जोडणी करून देण्यात यावी, पंधरा दिवसांनी होणारा पाणीपुरवठा दर दोन दिवसांनी नियमित करण्यात यावा आणि नागरिकांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान, या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवशक्ती हुडको कॉलनीतील संतप्त महिला नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. या निवेदनावर अॅड. जास्वंदी भंडारी, स्वाती अजय श्री. गोंदेकर, सुमन वासुदेव बोरसे, शकुंतला नितनवरे, भावना गवळी, अपर्णा श्री. गोंदेकर, विजया चौधरी, कलाबाई पाटील, माधुरी भिरुड, प्रमोद धांडे, अनिता जैस्वाल, मेघा तायडे यांच्यासह प्रभाग क्रमांक २३ मधील शिवशक्ती हुडको कॉलनीतील अनेक रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


