भुसावळ, दि. ३ जुलै (प्रतिनिधी) : शेळगाव बॅरेज व हतनूर धरणामध्ये मुबलक पाणी उपलब्ध असतानाही केवळ नगरपरिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे भुसावळकरांवर तीव्र पाणीटंचाईची वेळ आली आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याचा अन्याय सहन केला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी व्यक्त केली. रिपब्लिकन सेनेने नगरपरिषद प्रशासनाला दिलेला ४८ तासांचा अल्टिमेटम संपताच, शुक्रवारी (दि. ३ जुलै) दुपारी १२ वाजता नगरपरिषद कार्यालयासमोर धडक ‘मटके फोडो’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी मातीचे मडके फोडून नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त केला. शहरातील वाढती पाणीटंचाई, अनियमित पाणीपुरवठा आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रिपब्लिकन सेनेच्या प्रमुख मागण्या : शहरातील पाणीपुरवठ्याचे रोस्टर तात्काळ जाहीर करण्यात यावे. अॅलम-जेलीचा पुरेसा साठा उपलब्ध करून नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करावा. पाणीपुरवठा व्यवस्थेतील हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. यासह शहरातील विविध नागरी समस्यांबाबतही तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाने लवकरात लवकर प्रश्न सोडवला नाही, तर तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात येईल तसेच जबाबदार अभियंत्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी दिला. या आंदोलनात विनोद सोनवणे (जिल्हाध्यक्ष), वंदनाताई सोनवणे (रिपब्लिकन महिला सेना जिल्हाध्यक्षा), वंदनाताई आराक (जिल्हा महासचिव), देवदत्त मकासरे (मेजर) (जिल्हा उपाध्यक्ष), लिलाधर सपकाळे (भुसावळ शहराध्यक्ष), स्वप्नील सोनवणे (आयटी प्रमुख), बंटी नरवाडे, शर्मिला तायडे, उषा पाटील, विक्रम वानखेडे, पंकज नरवाडे, भारत गोफणे, दीपक सुरवाडे, दिलीप क्षिरसागर, विशाल नरवाडे, विजया वाघोदे, मिना भालेराव, पंकज बोदडे, नानू सूर्यवंशी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


