भुसावळ, दि. 21 जून 2026 (प्रतिनिधी) : जागतिक योग दिनानिमित्त आज सकाळी 8 वाजता तालुका विधी सेवा समिती, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, भुसावळ येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश-1 श्री एस. बी. हेडाऊ यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमास श्री एस. बी. हेडाऊ (जिल्हा न्यायाधीश-1), श्री जी. बी. पवार (सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर) तसेच श्री एम. आर. बागडे (द्वितीय सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर) उपस्थित होते. यावेळी भुसावळ वकील संघाचे पदाधिकारी ॲड. अभिजीत मेने व ॲड. भूपेश बाविस्कर यांचेसह सहभाग नोंदविला. योग शिबिराचे आयोजन तालुका विधी सेवा समितीचे अधीक्षक श्री एस. एस. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ लिपिक श्री डी. आर. चौधरी व कनिष्ठ लिपिक श्री गणेश निंबोळकर यांनी केले. कार्यक्रमात योग प्रशिक्षक श्री मनोज कुमार रावत व सौ. शीला मनोज कुमार रावत यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा न्यायालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान अध्यक्ष श्री एस. बी. हेडाऊ यांनी योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विशद केले. नियमित योगाभ्यासामुळे निरोगी जीवनशैली, मानसिक शांतता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. योग दिनानिमित्त आयोजित या शिबिरामुळे उपस्थितांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.




