भुसावळ (प्रतिनिधी) - पावसाळा तोंडावर आला असतानाही भुसावळ नगरपालिकेतर्फे अद्याप नालेसफाईच्या कामाचा मुहूर्त ठरलेला नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही नालेसफाई केवळ नावापुरती आणि वरवरचीच होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. या कारभारामुळे पावसाळ्यात नाले तुडुंब भरून पाणी लोकवस्तीत शिरण्याची आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता, नालेसफाईची संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत पारदर्शकपणे व्हावी, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर डी जावळे यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आणि भुसावळ नगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भुसावळ शहरात नालेसफाईच्या कामात मोठी अनियमितता असल्याचे समोर आले आहे. ठेकेदारांकडून केवळ नाल्याच्या वरच्या भागाची साफसफाई केली जाते, परिणामी पावसाळ्यात पाणी तुंबून ते थेट नागरिकांच्या घरात शिरते. यामुळे शहरात आरोग्याचे मोठे संकट निर्माण होते आणि साथीचे आजार पसरण्याचा धोका वाढतो. नालेसफाईच्या कामात पूर्ण पारदर्शकता यावी, यासाठी संपूर्ण सफाई प्रक्रियेचे चित्रीकरण (व्हिडिओ रेकॉर्डिंग) करण्यात यावे.पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाईचे काम युद्धपातळीवर आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. "नालेसफाईच्या नावाखाली होणारा पालिकेचा निधीचा अपव्यय आता थांबला पाहिजे. जोपर्यंत काम कॅमेऱ्यासमोर होत नाही, तोपर्यंत त्यात पारदर्शकता येणार नाही," असे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते शिशिर डी जावळे यांनी व्यक्त केले आहे.



