भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ रेल्वे विभागात २१ जून २०२६ रोजी १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यानिमित्त पथज्योत रेल्वे क्रीडांगण येथे सामूहिक योग सत्राचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना "निरोगी आणि सुदृढ वृद्धत्वासाठी योग" (Yoga for Healthy Ageing) अशी होती. या कार्यक्रमास भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल, वरिष्ठ रेल्वे अधिकारी, शालेय विद्यार्थी, रेल्वे कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. प्रसिद्ध योग प्रशिक्षिका सौ. संध्या सोनी आणि श्री. धीरेंद्र कुमार सोनी यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करून त्यांचे आरोग्यविषयक फायदे उपस्थितांना समजावून सांगितले. योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून तणावमुक्त जीवन, मानसिक संतुलन आणि अंतःशांती प्रदान करणारी जीवनशैली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. योगाभ्यासास प्रारंभ करण्यापूर्वी ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन करण्यात आले, तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. योग सत्रामध्ये प्राणायाम, विविध योगासने तसेच ध्यान यांचा समावेश होता. उपस्थितांनी शिस्तबद्ध पद्धतीने योगाभ्यास केल्याने परिसरात एकात्मता, समरसता आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले. “नियमित योग करा, निरोगी जीवन जगा” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. मुख्य कार्यक्रमासोबतच भुसावळ विभागातील विविध डेपो आणि कार्यशाळांमध्येही आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच सामाजिक माध्यमांच्या विविध व्यासपीठांद्वारे योगाचे महत्त्व आणि त्याचे आरोग्यदायी फायदे याबाबत जनजागृती करण्यात आली




