भुसावळ (प्रतिनिधी) , दि. २१ जून : "निरोगी शरीर, शांत मन; हाच पोलिसांचा खरा दागिना" आणि "योग: कर्मसु कौशलम्" हा संदेश डोळ्यांसमोर ठेवून जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या भुसावळ उपविभागातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ येथील शहर वाहतूक शाखेत सकाळी ६ ते ८ या वेळेत विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. केदार बारबोले, पोलीस निरीक्षक श्री. महेश गायकवाड आणि पोलीस निरीक्षक श्री. राहुल वाघ उपस्थित होते. 'महाराष्ट्र राज्य योग शिक्षक संघ, भुसावळ' यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात योग प्रशिक्षक श्री. यश प्रसाद आंबेकर आणि डॉ. राधा प्रसाद आंबेकर यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी योगासने, प्राणायाम, ध्यान तसेच तणावमुक्तीसाठी उपयुक्त विविध योगक्रियांचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. पोलीस सेवेत येणाऱ्या मानसिक व शारीरिक ताणतणावावर मात करण्यासाठी योग जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनविण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. या शिबिरात भुसावळ शहर, भुसावळ बाजारपेठ, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन तसेच शहर वाहतूक शाखेतील अधिकारी आणि पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वांनी उत्साहाने आणि शिस्तीत योगाभ्यास करत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांची कार्यक्षमता वाढावी आणि सकारात्मक जीवनशैलीचा प्रसार व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे योग शिबिर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले.



