भुसावळ (प्रतिनिधी) : भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला जगभरातून मोठ्या प्रमाणात समर्थन मिळाल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केला. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा असून योगाच्या माध्यमातून निरोगी, स्वस्थ आणि तणावमुक्त जीवनशैलीचा संदेश देणारा आहे. सकाळच्या शुद्ध व प्रसन्न वातावरणात अनेक नागरिक पायी चालणे, सायकलिंग, धावणे तसेच योगासने करण्यास प्राधान्य देतात. सकाळी पाच ते सहा वाजेदरम्यान वातावरणातील हवा तुलनेने अधिक शुद्ध असल्याने आरोग्यासाठी ती लाभदायक ठरते. मात्र, सध्याच्या काळात पर्यावरणपूरक वृक्षांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण घटत असून प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. अशुद्ध हवेमुळे फुफ्फुसांचे आजार, हृदयविकार तसेच इतर गंभीर आजारांमध्ये वाढ होत आहे. याचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होत असून अनेक नागरिक शारीरिक व मानसिक समस्यांनी त्रस्त आहेत. त्यामुळे योगासोबतच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे काळाची गरज असल्याचे मत पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी व्यक्त केले. यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासनांसोबतच मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करणारी पर्यावरणपूरक झाडे लावण्याचा, त्यांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड़ माँ के लिये’ या अभियानात सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.



