कंडारीत खळबळ: रेल्वे प्रशासनाची बुलडोझर कारवाई; धार्मिक स्थळाचे प्रवेशद्वार पाडल्याने तणाव :

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ रेल्वे मंडळांतर्गत येणाऱ्या कंडारी गावात लिम्पस क्लब परिसरातील श्री कपिलेश्वर महादेव मंदिराचे लोकवर्गणीतून उभे केलेले प्रवेशद्वार
 रेल्वे प्रशासनाने बुलडोझरच्या साहाय्याने एका बांधकामाधीन धार्मिक स्थळाचे प्रवेशद्वार पाडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंडारी गावात एका धार्मिक स्थळाच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरू होते. या प्रवेशद्वाराला धार्मिक नाव देण्याची प्रक्रियाही सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बुलडोझरच्या सहाय्याने बांधकामाधीन प्रवेशद्वार जमीनदोस्त केले.

घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि भाविक घटनास्थळी जमा झाले. बांधकामाबाबत रेल्वे प्रशासनाला काही आक्षेप असल्यास संबंधितांना आधी नोटीस देणे आवश्यक होते, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आलेल्या या कारवाईमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.

 या प्रकरणी  कंडारी संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावरती ठिय्या केला , पूर्ववत प्रवेशद्वाराची कमान उभी करून देण्याची रेल्वे प्रशासनाला मागणी केली असून रेल्वे प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे तसेच संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशीही मागणी केली आहे.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने ही कारवाई नेमक्या कोणत्या कारणास्तव केली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच या प्रकरणाची वस्तुस्थिती उघड होणार आहे.

सध्या कंडारी गावातील ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली असून, प्रशासनाचा अधिकृत खुलासा आणि पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.