विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक दाखले सेतू सुविधा केंद्रातुन सुरू करा – प्रा.धिरज पाटील ; शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विभागीय अधिकारी यांच्याकडे मागणी ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
दहावी, बारावीचा निकाल लवकरच लागेल व विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश दिला गेला आहे. तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिये दरम्यान विविध दाखले, प्रमाणपत्रांची गरज भासते परंतु भुसावळात सेतू सुविधा केंद्रात ह्या सुविधा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. विद्यार्थ्यांना दाखले वेळेत मिळण्यासाठी भुसावळ शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी भुसावळ उपविभागीय अधिकारी रामचंद्र सुलाने यांच्याकडे मागणी केली आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार: प्रा.धिरज पाटील
भुसावळ तालुक्यात सेतू सुविधा केंद्रावर गर्दी होत असते कारण व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. काहीवेळा सर्व्हर डाउनच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. प्रमाणपत्र सादर करण्यात विलंब झाल्यास विद्यार्थ्यांचा प्रवेश अडचणीत येण्याची शक्यता असते, त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याआधीच आवश्यक ती कागदपत्रे काढण्यासाठी त्वरित ह्या सर्व दाखल्यांच्या सुविधा सोशल डिस्टन्सचे पालन करीत सुरू कराव्यात त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार आहे.
वेळेत द्यावे लागतात कागदपत्रे:
आता पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असलेले दाखले काढण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केली असून यासर्व विद्यार्थ्यांना व नागरिकांना इतर कामांसाठी वेळेत वय, राष्ट्रीयत्व व डोमिसाइल प्रमाणपत्र, जातीचा दाखला, शेतकरी असल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर रिनिव्हल प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र आदी विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार विविध प्रमाणपत्रे वेळेत सादर करावी लागतात. काही प्रमाणपत्रे व दाखले मिळण्याचा अवधी पंधरा दिवस ते एक महिना असतो. महाराष्ट्र शासनाने आधीच प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली असून वेळेत दाखले न मिळाल्यास अनेक होतकरू व गरजू विद्यार्थी वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *