जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई; ९० हून अधिक वाहना विरुद्ध कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व विनापरवाना वाहतुकीस आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. २७ फेब्रुवारी २०२६ पहाटे ५ वाजता जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली.

जळगाव उपविभागात विशेष मोहीम

जळगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कारवाईचे नेतृत्व केले. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) तसेच सर्व संबंधित पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बांभोरी, टाकरखेडे, खेडी व परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी करून ती ताब्यात घेण्यात आली.

पोलीस स्टेशननिहाय कारवाई

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एकूण ९० हून अधिक वाहनांवर मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम २०७ अन्वये निरुद्ध (Detain) करण्याची कारवाई करण्यात आली.
यामध्ये
जळगाव तालुका पोलीस स्टेशन – ३२ ट्रॅक्टर व ०८ डंपर (एकूण ४० वाहने) कासोदा पोलीस स्टेशन – १५ ट्रॅक्टर , भडगाव पोलीस स्टेशन – १३ ट्रॅक्टर व ०१ डंपर , एरंडोल पोलीस स्टेशन – ०४ ट्रॅक्टर व ०१ डंपर , मेहुणबारे पोलीस स्टेशन – १५ ट्रॅक्टर व ०१ वाळूने भरलेला ट्रॅक्टर , मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४/२०२६ नोंदवून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३ (२) अन्वये पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

दस्तऐवजांची काटेकोर पडताळणी

कारवाई दरम्यान वाहनांचे वाहतूक परवाने (Permit), नोंदणी प्रमाणपत्र (RC), चालक परवाना (DL) आदी कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात आली. परवान्यातील अटींचे उल्लंघन करणारी अथवा आवश्यक कागदपत्रांशिवाय वाहतूक करणारी वाहने जागेवरच जप्त करून संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात ठेवण्यात आली आहेत.

जिल्हा पोलीस प्रशासनाने नैसर्गिक साधनसंपत्तीची अवैध चोरी करणाऱ्यांविरुद्ध अशा प्रकारच्या धडक मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येतील, असा इशारा दिला आहे.