किर्तनातील बोधामृताने अवघड वाट सुकर होऊन दिशा मिळते -भुसावळला किर्तनात गोपाळ महाराज यांचा सल्ला

भुसावळ (प्रतिनिधी ) – किर्तन लोकजागृतीचे प्रभावी व सशक्त माध्यम आहे. त्यातील बोधामृताने अवघड वाट सुकर होते. आई वडीलांनी मुलांना किर्तनाचा लळा लावला पाहिजे. संतांचा सहवास जीवन फलदायी करतो असे मत भडगाव तालुक्यातील लोण पिलांचे येथील तरुण किर्तनकार गोपाळ महाराज यांनी केले.

भुसावळात वरणगाव रोडवरील पद्मावती नगरात तीन दिवसीय बिजासनी माता मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा आयोजित केला आहे. त्या निमित्त किर्तन महोत्सवात गुरुवारी प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते. गायनाचार्य रामकृष्ण महाराज, मृदंगाचार्य हर्षल महाराज यांनी त्यांना साथसंगत केली. महोत्सव आयोजक पांडुरंग ओंकार पाटील, अलका पाटील, पवन पाटील यांनी किर्तन सेवा देणारे गोपाळ महाराज व साथीदार यांचा सत्कार केला. तत्पूर्वी सायंकाळी पाच वाजता बिजासनी मातेच्या मूर्तीचे आगमन झाले. पद्मावती नगर येथील लाल जैन मंदिर ते हनुमान मंदिर सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. परिसरातील महिला भाविक सहभागी झाले. शिवपूर कन्हाळा येथील माऊली साउंड सिस्टीम यांचे या किर्तन महोत्सवाला सहकार्य लाभले.

लोकपरंपरा, संस्कृती जपा
आयुष्यात कितीही पैसे कमवा पण माय बापाला विसरू नका. लोकभाषा, लोकपरंपरा, लोकसाहित्य जपा. आपल्या म्हणी, उखाणा, ओव्या मोठा अर्थ सांगतात. त्यात भाषेची होणारी सरमिसळ थांबली पाहिजे. वेळ अमूल्य आहे. तो वाया घालवू नका. मंदिराच्या पारावर, ओट्यावर बसून कुरापती काढू नका. आयुष्यात माणसं जोडा. लोककल्याणाचा हाच खरा प्रशस्त राजमार्ग आहे. गरजवंताला मदत करा असे गोपाळ महाराज म्हणाले.

शिवरायांचे विचार डोक्यात घ्या
हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आयुष पणाला लावले. संभाजी राजे यांनी बलिदान दिले. त्यांची आठवण ठेवून येणाऱ्या पिढीला राष्ट्रधर्माची शिकवण देणे गरजेचे आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताबाई यांच्या साहित्याची ओळख तरुणाईला झाली पाहिजे. त्यासाठी किर्तनाचा लळा लावावा लागेल. आई वडीलांनी आपली मुलं विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात मोबाइलच्या आहारी गेली असतील तर त्यांना वेळीच सावध व्हा. त्यांना पुस्तकांचा लळा लावा असे आवाहनही गोपाळ महाराज यांनी केले.