प्रवाशांच्या सोयीसाठी भुसावळ–दादर विशेष रेल्वेसेवेच्या संचालन कालावधीत वाढ :

मुंबई : प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन भारतीय रेल्वे प्रशासनाने भुसावळ–दादर दरम्यान धावणाऱ्या दोन त्रि-साप्ताहिक विशेष गाड्यांच्या फेऱ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

यानुसार गाडी क्रमांक 09049/09050 दादर–भुसावळ विशेष सेवा 27 मार्च 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच गाडी क्रमांक 09051/09052 दादर–भुसावळ विशेष सेवा 28 मार्च 2026 पर्यंत सुरू राहणार आहे.

गाडी क्रमांक 09049 (दादर–भुसावळ) आणि 09050 (भुसावळ–दादर) या विशेष गाड्या 27 मार्च 2026 पर्यंत धावतील. तर गाडी क्रमांक 09051 (दादर–भुसावळ) आणि 09052 (भुसावळ–दादर) या विशेष गाड्यांची सेवा 28 मार्च 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

या विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये किंवा रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. प्रवाशांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

आरक्षणाची सुविधा गाडी क्रमांक 09050 आणि 09052 साठी 20 फेब्रुवारी 2026 पासून उपलब्ध होणार आहे. प्रवासी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर (www.irctc.co.in) अग्रिम आरक्षण कालावधीअंतर्गत तिकीट बुक करू शकतात.

तसेच प्रवासी RailOne ॲप आणि NTES ॲपद्वारेही माहिती व आरक्षणाची सुविधा घेऊ शकतात. सविस्तर वेळापत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.