भुसावळ,(प्रतिनिधी ) – दि. १२ फेब्रुवारी २०२४ – राज्यात १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या इयत्ता बारावी मराठी प्रथम भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये गंभीर त्रुटी असल्याचा आरोप प्रा. ह. दलाल यांनी केला आहे. यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी करत त्यांनी परीक्षा मंडळावर उपरोधिक टीका केली असून “सदोष प्रश्नपत्रिका काढण्याची परंपरा कायम राखल्याबद्दल अभिनंदन” असे वक्तव्य केले आहे.

प्रा. दलाल यांनी पत्रकात नमूद केले आहे की, प्रश्नपत्रिकेच्या पहिल्याच पानावर “कृतिपत्रिका” या शब्दासोबत दिलेल्या सूचनांमध्ये लेखनदोष आढळतात. ‘आकलन व कृती’ हे शब्द वेगवेगळे लिहिले असून ‘कृती’ आणि ‘कृति’ असे दोन भिन्न प्रकार आढळतात. तसेच “लेखन नियमांनुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष दया वे” या सूचनेतही लेखनदोष असल्याचा त्यांनी दावा केला आहे. विद्यार्थ्यांकडून शुद्धलेखनाची अपेक्षा ठेवणाऱ्या मंडळाने स्वतः मात्र नियमांचे पालन न केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
राज्य शासनाने ९ नोव्हेंबर २००९ व ११ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रामाणिकृत मराठी वर्णमाला, अक्षरमाला व अंकांच्या काटेकोर वापराबाबत आदेश जारी केले असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र शासनाच्या अधिपत्याखालील शालांत परीक्षा मंडळानेच या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
प्रश्नपत्रिकेमध्ये ‘गद्य, पद्य’ ऐवजी ‘गदय, पदय’ अशी लेखनरचना आढळल्याचे तसेच जोडाक्षरांच्या वापराबाबत नियमभंग झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘विठ्ठल, सुद्धा, मुद्दा, द्वंद्व’ यांसारख्या शब्दांचे चुकीच्या पद्धतीने लेखन केल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाय ‘श’ आणि ‘ल’ या अक्षरांचे जुन्या पद्धतीने लेखन केल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
व्याकरण विभागातील प्रश्न अत्यंत सोपे असून आठवी-नववीच्या स्तरावरील असल्याची टीकाही त्यांनी केली. विद्यार्थ्यांची भाषिक समृद्धी वाढवण्यासाठी अधिक अर्थपूर्ण शब्दप्रयोग व उपयोजित मराठी विभागात मुलाखत, अहवाल किंवा वृत्तलेखनासारखे उपयुक्त प्रश्न द्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हा लेख केवळ दोष निदर्शनास आणण्यासाठी नसून शिक्षणव्यवस्था निर्दोष व जबाबदार असावी, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठीच हा अट्टाहास असल्याचे प्रा. दलाल यांनी स्पष्ट केले आहे.


