नुपूर महोत्सवमध्ये भुसावळकर रसिक मंत्रमुग्ध नुपूर डान्स अकॅडमीचा स्तुत्य उपक्रम:

भुसावळ,(प्रतिनिधी ) – भुसावळ येथील नुपूर कथक डान्स अकॅडमीच्या विद्यमाने दरवर्षी आयोजित नुपूर महोत्सव या शास्त्रीय नृत्य महोत्सवाने रसिकांचे मन मोहून घेतले. महाशिवरात्रीनिमित्त रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता डॉ. बी. व्ही. खाचणे हॉल, नंदनवन कॉलनी येथे हा महोत्सव पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन झुंजार लेवा समाज सांस्कृतिक मंडळाचे संचालक सुभाष पाटील, शांती विद्यामंदिर फैजपूरच्या अध्यक्षा श्रीमती शुभांगी महाजन, सुप्रसिद्ध राष्ट्रीय नर्तक श्री रामा कौंडिण्य (आंध्र प्रदेश), नुपूर अकॅडमी संचालक रमाकांत भालेराव, तसेच अकॅडमीच्या नृत्य शिक्षिका सौ. चारू भालेराव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी संचालक रमाकांत भालेराव यांनी अकॅडमीचे विविध उपक्रम आणि महोत्सवाची माहिती दिली.

महोत्सवात विविध शास्त्रीय नृत्यप्रकारांचा समावेश होता, ज्यात कथक, भरतनाट्यम, कुचीपुडी, मोहिनीअट्टम, ओडिसी, मणिपुरी, कथकली यांचा समावेश होता. यावर्षी विशेष आकर्षण म्हणून आंध्र प्रदेशचे रामा कौंडिण्य यांनी कुचीपुडी नृत्य सादर केले.

कार्यक्रमाची सुरुवात “नांदी पंचतुंड नररुंड मालघर” या गीतावर गायत्री चौधरी, पुनम पाटील, पूजा अग्रवाल, साक्षी कल्याणकर, चेतश्री चौधरी यांनी नृत्य सादर करून केली. त्यानंतर शुद्ध कथक नृत्य सादरीकरण झाले, ज्यात उर्वशी कोळी, डिंपल गाढे, हिमांशू जावळे यांनी आपली कला प्रकट केली. तबल्यावर शिरीष जोशी, संवादिनीवर स्मिता कुलकर्णी, व पढ़त चारू भालेराव यांनी संगत दिली.

महोत्सवात गणेश वंदना, जुगलबंदी, तराना व फ्युजन नृत्य प्रकारांनी रसिकांचे मन जिंकले. विशेष नृत्य सादरीकरण करणाऱ्या कलाकारांमध्ये नुपूर भालेराव, मोक्षदा तळले, अश्वती सपकाळ, जेसिका अब्राहम, मानसी पवार, जान्हवी खाडवे आदींचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी कलावंतांनी एकत्र येऊन “नर्मदाष्टक” सादर केले. या वेळी विशारद परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी व सहभागी सर्व कलावंतांचा सत्कार करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे, राष्ट्रीय स्तरावर शास्त्रीय नृत्याचा प्रचार करणाऱ्या व्यक्तींना “नृत्य श्री पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले, यावर्षी हा पुरस्कार रामा कौंडूल्य (आंध्र प्रदेश) यांना प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले, तर यशस्वीतेसाठी रितिक सोनार, शुभम बोलके, प्रांजल कुलकर्णी, गिरीश पाटील, प्रकाश फेगडे, भावेश फेगडे यांनी महत्त्वाचे योगदान दिले.

महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि शास्त्रीय नृत्याचा आस्वाद घेत सर्व रसिक मंत्रमुग्ध झाले.