भुसावळ (प्रतिनिधी) :
नाहाटा महाविद्यालय , भुसावळ येथे ‘ ऑन जॉब टेनिंग ‘ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव देणे व त्यांच्या कौशल्यांचा विकास घडवून आणणे हा होता.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष कार्यानुभव मिळावा, तसेच रोजगारक्षम कौशल्ये विकसित व्हावीत यासाठी विविध मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत प्रमुख वक्ते राजेश ठाकरे (सह-संस्थापक, इलेक्ट्रोसॉफ्ट चे मुख्य कार्यकारी अधिकारी) यांनी व्यक्त केले.
भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, मानव्यविद्या शाखा, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. OJT (ऑन जॉब ट्रेनिंग) अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा द्वितीय वर्ष पदवी व प्रथम वर्ष पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच बऱ्हाटे हे होते. उदघाटक व प्रमुख वक्ते म्हणून राजेश ठाकरे, उपप्राचार्य प्रा. डॉ. डी. एन .पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ जी आर. वाणी, समन्वयक. डॉ प्रफुल्ल इंगोले, प्रा डॉ . रश्मी शर्मा, डॉ. मनोजकुमार जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच बऱ्हाटे म्हणाले की , आजच्या स्पर्धात्मक युगात ज्ञानासोबतच कौशल्य विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार ऑन जॉब टेनिंग उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या करिअर साठी फायदा होईल . मानव्यविद्या शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी उपप्राचार्य डॉ डी .एन. पाटील यांनी मार्गदर्शन केले तर वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रा डॉ .रश्मी शर्मा यांनी मार्गदर्शन केले . विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ मनोजकुमार जाधव यांनी मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ प्रफुल्ल इंगोले यांनी केले .सूत्रसंचालन प्रा एकता बजाज यांनी केले .यावेळी ऑन जॉब ट्रेनिंग विषयाचे समन्वयक , प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते .आभार प्रा .डॉ ममताबेन पाटील यांनी केले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारीवर्गाने परिश्रम घेतले.



