भुसावळ शहरात संत रविदास महाराज स्मारक उभारण्याची मागणी :

भुसावळ (प्रतिनिधी) -– शहरात संत शिरोमणी रविदास महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी चर्मकार समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यासंदर्भात कार्यकर्त्यांनी भुसावळ नगरपालिकेच्या मा. मुख्याधिकारी व नगराध्यक्षा मा. गायत्रीताई भंगाळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

संत रविदास महाराज यांचे सामाजिक, आध्यात्मिक व समतेचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचावेत, तसेच समाजाला प्रेरणा मिळावी यासाठी शहरात स्मारक असणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदन देताना शिवसेना माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे यांच्यासह राजू समशेर, गणेश मोहन, तुळशी राम, जाधव, युवराज, रामनाथ, दीपक, बाबू, दिनेश, शंकर, रमेश, किरण, प्रकाश, मनोज, संदीप, संतोष आदी चर्मकार समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील विविध सामाजिक संघटनांनीही या मागणीला पाठिंबा दर्शवावा, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.