शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम – प्रभाकर आप्पा सोनवणे

यावल(प्रतिनिधी ) – जिल्हा परिषद मराठी शाळा यू वढोदे ता यावल येथे नुकतेच स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य मा. प्रभाकर आप्पा सोनवणे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “मानवी जीवन सुंदर, सुसंस्कृत व चारित्र्यसंपन्न घडवण्यासाठी तसेच समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांच्या अंगी आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी शिक्षण हेच सर्वात प्रभावी माध्यम आहे.”

या कार्यक्रमास यावल तालुक्याच्या तहसीलदार सौ. मोहनमाला नाझीरकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत त्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यावल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. विश्वनाथ धनके, यावल तालुका खरेदी-विक्री संघाचे उपसभापती व युवा नेते तेजस पाटील, वढोदे गावाचे सरपंच संदीप भैय्या सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पोलीस पाटील श्री. चेतन सोनवणे, ग्रामस्थ व परिसरातील मान्यवर शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देवा श्री गणेशा, वारकरी गीत, शिवकन्या गीत, छावा गीत, रिमिक्स गाणी, गोंधळ, भारूड अशा विविध नावीन्यपूर्ण कलाप्रकारांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या बालकलाकारांचे कौतुक करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष पुढाकार घेण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. वैशाली दिनेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन उपशिक्षक श्री. सचिन धालपे यांनी केले. विद्यार्थ्यांची तयारी सौ. प्रमिला धालपे यांनी उत्कृष्टरीत्या करून घेतली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. किरण सोनवणे, श्री. पंकज कोळी, श्री. भागवत बाविस्कर, श्रीमती योगिता बाविस्कर तसेच ग्रामपंचायत, शाळेचे शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे विशेष सहकार्य लाभले.