दिव्यांग लाभार्थ्यांसाठी UDID कार्ड अनिवार्य तहसील कार्यालय, भुसावळ यांची महत्त्वाची सूचना

भुसावळ (प्रतिनिधी) – तहसील कार्यालय, भुसावळ यांच्यामार्फत तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या परिपत्रक क्रमांक दिव्यांग-2024/प्र.क्र.86/दि.क्र.2, दिनांक 27 जून 2024 नुसार विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र (UDID कार्ड) अनिवार्य करण्यात आले आहे.

या निर्णयानुसार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे UDID कार्ड असणे आवश्यक आहे.

ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे अद्याप UDID कार्ड उपलब्ध नाही, त्यांनी तातडीने UDID कार्ड काढून घ्यावे. तसेच ज्या लाभार्थ्यांच्या UDID कार्डची मुदत संपलेली आहे, त्यांनी सेतु सुविधा केंद्रामार्फत नवीन UDID कार्डसाठी अर्ज करावा, असे आवाहन तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

सर्व संबंधित लाभार्थ्यांनी एका महिन्याच्या आत आपले UDID कार्ड तहसील कार्यालय, भुसावळ येथे किंवा आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

निर्धारित कालावधीत UDID कार्ड सादर न केल्यास संबंधित शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात, असेही तहसील कार्यालयाने स्पष्ट केले आहे.