साकरी येथे विशेष ग्रामसभा : महिला दक्षता समिती स्थापन, अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी)-
तालुक्यातील साकरी येथे २७ जानेवारी रोजी झालेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींच्या निर्घृण हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर ३१ जानेवारी रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या ग्रामसभेत गावाच्या सुरक्षिततेसंदर्भात महत्त्वाचे निर्णय एकमताने घेण्यात आले.

या वेळी गावात महिला दक्षता समिती स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. महिलांविरोधातील गुन्हे, टवाळखोर प्रवृत्ती व संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या समितीकडे देण्यात येणार आहे. पंचायत समितीचे निरीक्षक सचिन पाठक यांनी सांगितले की, गावातील समाजविघातक प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महिला दक्षता समितीमार्फत समज व प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल.

या हत्याकांडाचा खटला प्रभावीपणे आणि काटेकोरपणे चालविण्यासाठी ज्येष्ठ सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली.

गावात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. कोणतेही आक्षेपार्ह किंवा संशयास्पद वर्तन आढळल्यास तात्काळ महिला दक्षता समिती किंवा पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले. तसेच आरोपींना कोणत्याही प्रकारे मदत करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.

या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली. घटनेमुळे संपूर्ण गावात तीव्र संतापाचे वातावरण असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

या ग्रामसभेसाठी हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते. यावेळी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड व त्यांचा स्टाफही उपस्थित होता.