मुख्यमंत्री स्वच्छ व सुंदर शाळा अभियानात दीर्घकाळ टिकणाऱ्या ऑक्सिजनयुक्त वृक्षलागवडीवर भर देण्याचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी )-

राज्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री स्वच्छ व सुंदर शाळा अभियानाअंतर्गत केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता शाळांच्या प्रांगणात व परिसरात दीर्घकाळ टिकणाऱ्या ऑक्सिजनयुक्त वृक्षांची लागवड व संगोपन विद्यार्थ्यांच्या सहभागातून होणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. सुरेंद्रसिंग पाटील, संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान यांनी केले आहे.

मुख्यमंत्री स्वच्छ व सुंदर शाळा अभियानाचे अभियान क्रमांक १, २ यशस्वीपणे पार पडले असून नुकतेच अभियान ३ पूर्ण झाले. विशेष म्हणजे अभियान १ व २ चा अनुभव असतानाही अभियान ३ ची मुदत संपल्यानंतर शाळांसाठी पुन्हा १५ दिवसांची मुदतवाढ देऊन ती १५ जानेवारीपर्यंत करण्यात आली होती. शालेय जीवनात विद्यार्थ्यांवर होणारे संस्कार लक्षात घेता, शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये श्रमाची आवड निर्माण करणे व नियमित स्वच्छता उपक्रम राबविणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

प्रत्येक शाळेला सामाजिक वनीकरण विभागामार्फत दरवर्षी २०० वृक्षरोपे मोफत उपलब्ध करून दिली जातात. मात्र या अभियानात वृक्षलागवड केवळ कागदोपत्री न राहता ती प्रत्यक्ष विद्यार्थ्यांमार्फत होऊन त्यांचे संगोपन दीर्घकाळ केले जाते की नाही, याची तपासणी होणे गरजेचे आहे. शाळेच्या प्रांगणात वड, पिंपळ, नीम, औदुंबर, कदम यांसारखी दीर्घायुषी व पर्यावरणपूरक झाडे असणे किंवा ती लावणे अभियानात सहभागी होण्यासाठी अनिवार्य करावे, अशी मागणी त्यांनी केली.

गावाच्या हद्दीत निसर्गनिर्मित सर्व सजीवांसाठी उपयुक्त असलेली झाडे विद्यार्थ्यांच्या सहभागातून लावल्यास विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जाणीव निर्माण होईल. यामुळे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “एक पेड माँ के लिये” या अभियानातही शाळांचा परिपूर्ण सहभाग नोंदविला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

या अभियानात २०० गुणांची मूल्यांकन पद्धत असून त्यामध्ये सेंद्रिय खत निर्मिती, परसबाग तयार करणे, सेंद्रिय भाजीपाल्याची लागवड यासारख्या घटकांचा समावेश आहे. यामुळे शेतीशी संबंधित विद्यार्थ्यांना लहान वयातच सेंद्रिय शेतीचे ज्ञान मिळते, तसेच शहरी भागात गच्चीवर किंवा अंगणात परसबाग कशी तयार करावी याचेही मार्गदर्शन होते.

सध्याच्या काळात नैसर्गिक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळला असून वायुप्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनी व अग्नी प्रदूषण यामुळे सर्व सजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शाळांच्या माध्यमातून दीर्घकाळ टिकणाऱ्या ऑक्सिजनयुक्त वृक्षांची लागवड करणे ही काळाची गरज असल्याचे मत डॉ. पाटील यांनी व्यक्त केले.

स्वच्छ शाळा अल्पकाळात अस्वच्छ होऊ शकते तसेच भित्तीचित्रे कालांतराने नष्ट होतात; मात्र लावलेली झाडे वर्षानुवर्षे टिकून राहून प्रदूषण रोखण्यासाठी ऑक्सिजन निर्मितीचे कार्य करतात. त्यामुळे पुढील मुख्यमंत्री स्वच्छ व सुंदर शाळा अभियानात वृक्षलागवड व संगोपन हा मुख्य निकष म्हणून समाविष्ट करावा, अशी ठाम भूमिका पर्यावरण जागर प्रतिष्ठानतर्फे मांडण्यात आली आहे.