अंतर्नाद आयोजित तीन दिवशीय पुष्पांजली प्रबोधनमाला यावल–रावेरमध्ये होणार : प्रथम पुष्प शैलेश पाटील, द्वितीय प्रा. डॉ. संदीप धापसे, तर तृतीय बबनराव काकडे गुंफणार

भुसावळ (प्रतिनिधी )- माजी खासदार तथा आमदार कृषीमित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अंतर्नादतर्फे आयोजित पुष्पांजली प्रबोधनमाला यंदा यावल व रावेर तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये तीन दिवस होणार आहे. या प्रबोधनमालेचे यंदा आठवे वर्ष आहे.

प्रबोधनमालेतील प्रथम पुष्प १७ जानेवारी रोजी सकाळी ९.४५ वाजता न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, भालोद (ता. यावल) येथे होणार असून भुसावळ येथील शैलेश पाटील ‘शिक्षण म्हणजे काय?’ या विषयावर व्याख्यान देतील. ते जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे अधिव्याख्याता म्हणून कार्यरत असून शिक्षक मार्गदर्शन व शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी सातत्याने कार्य करीत आहेत.

द्वितीय पुष्प १९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता सौ. कमलाबाई अग्रवाल गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, रावेर येथे होणार आहे. प्रा. डॉ. संदीप धापसे ‘स्पर्धा परीक्षा व करिअरच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन करतील. ते श्री. व्ही. एस. नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रावेर येथे उपप्राचार्य असून १८ वर्षांचा अध्यापन अनुभव आहे.

तृतीय पुष्प २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, न्हावी (ता. यावल) येथे होणार असून फैजपूरचे प्रांताधिकारी बबनराव काकडे ‘व्यक्तिमत्त्व विकास व स्पर्धा परीक्षा’ या विषयावर व्याख्यान देतील. प्रशासन, महसूल व कायदेविषयक क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ अनुभवामुळे ते प्रभावी वक्ते म्हणून परिचित आहेत. ‘रंग जीवनाचे’ या ललित लेखसंग्रहाचे ते लेखक आहेत.

बोचऱ्या थंडीतही विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने ही प्रबोधनमाला आयोजित करण्यात आली आहे. रावेर विधानसभेचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे, दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुवेंद्र महाजन व जळगावचे उद्योजक अजय बढे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रकल्पप्रमुख म्हणून ज्ञानेश्वर घुले, समन्वयक चंद्रकांत सूर्यवंशी व सहसमन्वयक ललित महाजन काम पाहत आहेत.

दरवर्षी ही प्रबोधनमाला भुसावळ शहर व परिसरातील शाळांमध्ये फिरत्या स्वरूपात राबवली जाते. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारांची रुजवणूक, स्पर्धा परीक्षांबाबत माहिती व अधिकाऱ्यांशी थेट संवादाची संधी उपलब्ध करून देणे हा यामागील उद्देश असल्याची माहिती प्रकल्पप्रमुख ज्ञानेश्वर घुले यांनी दिली.

आजवर या प्रबोधनमालेत राज्यातील अनेक नामवंत वक्त्यांची व्याख्याने झाली असून यंदाही विद्यार्थ्यांनी व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

नियोजन समिती ….

यशस्वीतेसाठी डॉ. संजू भटकर, योगेश इंगळे, जीवन महाजन, प्रदीप सोनवणे, प्रसन्न बोरोले, शैलेंद्र महाजन, अमितकुमार पाटील, विक्रांत चौधरी, समाधान जाधव, भूषण झोपे,अमित चौधरी, डॉ. प्रा.श्यामकुमार दुसाने, हितेंद्र नेमाडे, राजू वारके, कुंदन वायकोळे, देव सरकटे, तेजेंद्र महाजन, राहुल भारंबे ,ललित महाजन, निवृत्ती पाटील, जीवन सपकाळे, हरीश भट, कपिल धांडे, शिरीष कोल्हे, केतन महाजन, उमेश फिरके, विपीन वारके, मंगेश भावे, सचिन पाटील, प्रमोद पाटील, योगेश साळुंके आणि अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील. आदीसह नियोजन समिती परिश्रम घेत आहे.