भुसावळ (प्रतिनिधी) –

जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार, दि. 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांना स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. क्यू. एस. एम. शेख यांनी अधिकृत आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार, जळगाव मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील अपीलीय, दिवाणी व फौजदारी न्यायालये तसेच त्यांची कार्यालये 15 जानेवारी रोजी पूर्णतः बंद राहणार आहेत. मतदान प्रक्रियेत नागरिकांना निर्बंधाविना सहभागी होता यावे, तसेच न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, या उद्देशाने ही सुटी जाहीर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या सुटीची भरपाई करण्यासाठी शनिवार, दि. 14 फेब्रुवारी 2026 (दुसरा शनिवार) रोजी जळगाव मुख्यालयासह संपूर्ण जिल्ह्यातील सर्व न्यायालये व त्यांची कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे न्यायालयीन कामकाजावर कोणताही दीर्घकालीन परिणाम होणार नसून, प्रलंबित प्रकरणांची सुनावणी व प्रशासकीय कामकाजाची भरपाई पुढील महिन्यात करण्यात येणार असल्याची माहिती न्यायालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


