भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील गजबजलेल्या अप्सरा चौक परिसरात आज शुक्रवार रोजी सकाळी मोटारसायकल पार्किंगच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर तणावात झाले. या घटनेचे पडसाद छबीलदास कपडा मार्केटमध्ये उमटल्याने काही काळ बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाले.

आज सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास दुकानासमोर मोटारसायकल उभी करण्यावरून एका लोडगाडी चालक आणि दुकानदार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. सुरुवातीला साधा वाद वाटणारी ही बाब काही वेळातच वाढत गेली आणि परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. वाद वाढत असल्याची माहिती मिळताच आजूबाजूच्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने छबीलदास कपडा मार्केटमधील व्यापाऱ्यांनी तात्पुरती दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. अचानक दुकाने बंद झाल्यामुळे बाजारात आलेल्या ग्राहकांची गैरसोय झाली असून काही काळ बाजारपेठ ओस पडल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान घटनेनंतर व्यापारी व ठेलेवाले मोठ्या संख्येने बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल झाले. दोन्ही गटांकडून परस्परांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत अप्सरा चौक व परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला.
अप्सरा चौक हा शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग असल्याने या घटनेचा परिणाम वाहतुकीवरही झाला. काही काळ वाहनांची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी मध्यस्थीची भूमिका घेत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून संपूर्ण घटनेचा पुढील तपास बाजारपेठ पोलिसांकडून सुरू आहे.



