भुसावळ | दि. ८ जानेवारी २०२६

भुसावळ तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे प्लास्टिक प्रदूषणामुळे वन्यजीवांना होणाऱ्या धोक्याचे गंभीर चित्र समोर आले असतानाच, स्थानिकांच्या सतर्कतेमुळे एका दुर्मिळ पिंगळा पक्ष्याचे (Spotted Owlet – Athene brama) प्राण वाचले आहेत.
निंभोरा बुद्रुक येथील त्रिरत्न बुद्ध विहार परिसरात गेल्या दोन दिवसांपासून एका झाडावर प्लास्टिकच्या मंज्यात अडकलेला पिंगळा पक्षी मृत्यूशी झुंज देत होता. विहाराच्या मैदानात खेळत असलेल्या लहान मुलांनी हा पक्षी उलटा लटकलेला पाहून ही बाब पत्रकार प्रकाश सरदार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी विहारात जागतिक धम्म दिनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती.
प्रकाश सरदार यांनी तात्काळ परिस्थितीची गंभीरता ओळखून गावातील सिद्धार्थ इंगळे यांना बोलावले. सिद्धार्थ इंगळे यांनी धैर्य दाखवत झाडावर चढून सावधपणे पक्ष्याला खाली उतरवले. त्यानंतर पक्ष्याला पाणी व अन्न देऊन प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्वरित वन विभागाला माहिती देण्यात आली.
वन विभागाचे कर्मचारी जीवन कोलते घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष्याला प्लास्टिकच्या जाळ्यातून पूर्णपणे मुक्त करण्यात आले. तपासणीनंतर हा पक्षी वन विभागाच्या पहिल्या संरक्षित यादीतील पिंगळा (Spotted Owlet) असल्याचे स्पष्ट झाले. पक्ष्याला किरकोळ जखमा झाल्या होत्या, मात्र वेळीच उपचार मिळाल्याने त्याची प्रकृती स्थिर झाली आहे. त्यानंतर त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.
पिंगळा हा भारतीय घुबड प्रजातीतील सर्वात लहान निशाचर पक्षी असून ठिपकेदार पिसांमुळे तो सहज ओळखता येतो. कीटक, उंदीर, लहान सरडे व बेडूक खाऊन तो पर्यावरणातील नैसर्गिक संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. मात्र प्लास्टिक कचरा आणि मंज्यामुळे अशा पक्ष्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होत आहे.
या घटनेतून प्लास्टिक प्रदूषणाचे दुष्परिणाम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. प्रकाश सरदार, सिद्धार्थ इंगळे आणि वन कर्मचारी जीवन कोलते यांच्या तत्परतेमुळे एक दुर्मिळ जीव वाचला. पर्यावरण व वन्यजीव संरक्षणासाठी सामूहिक जबाबदारी आणि जागृती किती आवश्यक आहे, याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.


