भुसावळ (प्रतिनिधी) :
भुसावळ पालिकेत महिला नगराध्यक्षा विराजमान झाल्याबद्दल आम्हाला निश्चितच आदर आहे. मात्र शहरातील विकासकामे थांबवल्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारणे हा आमचा अधिकार आहे. त्यात नगराध्यक्षांचा कुठेही उल्लेख नसताना गुन्हे दाखल करण्याची भाषा करणे म्हणजे दबावतंत्र असून अशा धमक्यांना भाजप कधीच घाबरणार नाही. शंभर गुन्हे दाखल झाले तरी आम्ही चुकीच्या कामांचा जाब विचारतच राहू, असा ठाम इशारा भाजप गटनेते युवराज लोणारी यांनी पत्रकार परिषदेत दिला.

गुरुवारी दुपारी मंत्री संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत लोणारी यांनी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे व माजी आमदार संतोष चौधरी यांच्या आरोपांचा समाचार घेतला. नगराध्यक्षांचे कालचे वक्तव्य पूर्णपणे स्क्रीप्टेड होते, लिहून दिलेले भाषणच त्यांनी वाचले, अशी टीकाही त्यांनी केली.
धमक्यांनी भाजप दबणार नाही
लोणारी म्हणाले, शहरात चुकीचे काम झाले तर भाजप आवाज उठवणारच. गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या हास्यास्पद असून अशा दबावतंत्राला आम्ही भीक घालत नाही.
जलकुंभाची जागा बदलण्यामागे तांत्रिक कारण
संतोषी माता मंदिराजवळील जलकुंभाची जागा पीएमसीच्या निर्णयानुसार बदलण्यात आली आहे. तीन महिने काम सुरू असताना अचानक मुख्याधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशाने काम बंद करण्यात आले. अमृत योजनेला विलंब झाल्याचे मान्य असले तरी भुसावळकरांना वेळेत पाणी मिळणे हे आमचे प्राधान्य आहे. शहरविकासाच्या आड राजकारण आणले तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असेही लोणारी म्हणाले.
“नगराध्यक्षांचा खरा बोलावता धनी कोण?” हा प्रश्न शहरवासीयांनाही ठावूक आहे, असे सूचक विधान त्यांनी केले.
हत्याकांडात भाजपाचेच नुकसान
शहरातील गुन्हेगारीवर बोलताना लोणारी म्हणाले की, आतापर्यंत झालेल्या हत्याकांडात भाजप पदाधिकाऱ्यांचेच नुकसान झाले आहे. या घटनांमागील अदृश्य शक्ती कोण होत्या, हे सुज्ञ भुसावळकरांना माहीत आहे. जुने मुद्दे उकरायला लावू नका, असा इशाराही त्यांनी दिला.
ग्रॅव्हीटी न कळणाऱ्यांना योजना कळणार कशी?
व्यापारी संकुलांपेक्षा आधी पाणीप्रश्न सोडवणे गरजेचे आहे. अमृत योजनेत उद्भवाची जागा बदलल्याने तांत्रिक अडचणी टळल्या व नवीन पाइपलाईन टाकण्यात आली. सातवी पास लोकांना ग्रॅव्हीटी काय कळणार, त्यांनी योजनेवर बोलणेच हास्यास्पद आहे, अशी टीका लोणारी यांनी केली.
संतोषी माता सभागृहाजवळील जागा बळकावण्याचे आरोपही त्यांनी तथ्यहीन असल्याचे सांगितले.
‘अमृत’च्या कामाची गुणवत्ता नक्की तपासा
अमृत जलकुंभ व पाइपलाईनच्या कामाची गुणवत्ता तपासण्यास आमची हरकत नाही. मात्र तपासणीचे अधिकार नगराध्यक्षांचे असून बाहेरच्या व्यक्तींनी पालिकेत हस्तक्षेप करू नये, असे लोणारी म्हणाले. चेकबुक व अकाउंटबुक कुणाच्यातरी घरी नेण्यात आल्याचा प्रकार दुर्दैवी असल्याची टीकाही त्यांनी केली.
भाजपचा सवाल पुढेही सुरूच राहील
भाजपा शहराध्यक्ष किरण कोलते म्हणाले, शहर विकासासाठी भाजपचे सहकार्य राहील, मात्र चुकीच्या कामांवर जाब विचारणे सुरूच राहील. जाब विचारताना नगराध्यक्षांचा उल्लेख कुठेही केलेला नाही.
घेराव म्हणजे दबाव नव्हे
भाजप जिल्हा सरचिटणीस परीक्षित बऱ्हाटे म्हणाले, जलकुंभाचे काम पालिकेच्या एनओसीनंतरच सुरू झाले होते. अचानक काम बंद करणे म्हणजे शहरवासीयांना वेठीस धरणे आहे. चांगल्या विकासकामांना भाजपचा पाठिंबा राहील.
प्रभागासाठी ५० लाखांचा निधी
नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी प्रभाग क्रमांक २२ मधील अल्पसंख्यांक भागासाठी मंत्री संजय सावकारे यांनी ५० लाखांचा निधी दिल्याची माहिती दिली. त्यांच्या नेतृत्वात शहरात विकासकामांची गती वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त करीत चुकीच्या कामांना नक्कीच विरोध राहील, मात्र शहर विकासासाठी पुढाकारच असेल अशी स्पष्टोक्ती यावेळी दिली
पत्रकार परिषदेला गटनेते युवराज लोणारी, उपगटनेते परीक्षित बऱ्हाटे, किरण कोलते, पिंटू कोठारी, गिरीश महाजन, राजेंद्र आवटे, महेंद्रसिंग ठाकूर, निक्की बत्रा, विशाल नाटकर, सुजित भोळे, संदीप सुरवाडे, अॅड. बोधराज चौधरी, बापू महाजन, देवा वाणी, कैलास चौधरी, प्रशांत नरवाडे, बाळा सोनवणे, रुपेश देशमुख, अल्बर्ट तायडे आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


