नैसर्गिक आपत्ती व वाढते आजार हे पर्यावरणीय असंतुलनाचे परिणाम : नववर्षात पर्यावरण रक्षणाचा संकल्प करण्याचे आवाहन – डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

भुसावळ – प्रतिनिधी | 31 डिसेंबर 2025

31 डिसेंबर 2025 हा वर्षाचा शेवटचा दिवस असताना, गेल्या वर्षभरात आलेल्या नैसर्गिक आपत्ती व वाढत्या आजारांनी मानवजातीला गंभीर इशारा दिला असल्याचे मत पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी व्यक्त केले आहे. निसर्गनिर्मित साधनसंपत्तीची मोठ्या प्रमाणावर झालेली हानी हेच आज नैसर्गिक आपत्ती आणि विविध गंभीर आजारांचे मूळ कारण असल्याचे त्यांनी सांगितले.

2025 मध्ये अनेक भागांत ढगफुटीसदृश पावसामुळे शेतजमिनी वाहून गेल्या, जमिनीचा पोत नष्ट झाला आणि अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. जीव वाचवण्यासाठी नागरिकांना स्थलांतर करावे लागले, तर मोठ्या प्रमाणावर जनावरे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले.

हवामान बदलाचा परिणाम मानवी आरोग्यावरही गंभीरपणे दिसून येत आहे. हिमोग्लोबिनचे प्रमाण घटणे, विशेषतः शालेय मुला-मुलींमध्ये अ‍ॅनिमियाचे वाढते प्रमाण, लहान वयातच डायबिटीस, किडनी विकारांमुळे वाढते डायलिसिसचे प्रमाण, तसेच कॅन्सर, अँजिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रियांची संख्या वाढत असल्याकडे डॉ. पाटील यांनी लक्ष वेधले. दूषित हवा, रासायनिक शेतीतून तयार होणारे अन्न आणि पर्यावरणीय असंतुलन यांचा याला थेट संबंध असल्याचे त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर येत्या १ जानेवारी 2026 पासून प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संतुलनासाठी ठोस संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. रस्त्यांच्या दुतर्फा, मोकळ्या जागा, शाळा, दवाखाने, कार्यालये, शेताच्या बांधावर तसेच घराच्या अंगणात फळझाडे व फुलझाडांची संगोपनासह वृक्षलागवड करणे, रासायनिक शेतीऐवजी हळूहळू सेंद्रिय शेतीकडे वळणे, परिसर स्वच्छ ठेवणे, पाण्याचा योग्य वापर करणे, सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करणे, सिंगल-यूज प्लास्टिक टाळणे आणि ध्वनीप्रदूषण कमी करणे या उपायांवर त्यांनी भर दिला.

“निसर्गाला रोखता येत नाही, पण निसर्गाशी सुसंवाद साधता येतो. पृथ्वीचे अस्तित्व आणि निरोगी भविष्यासाठी पर्यावरण रक्षण हाच एकमेव मार्ग आहे,” असे डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी सांगितले.

— पर्यावरण जागर प्रतिष्ठान