भुसावळ | प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील झोनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये मंगळवारी (३० डिसेंबर) मध्यरात्री अन्नातून मोठ्या प्रमाणात विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली. संस्थेच्या ‘अन्नपूर्णा’ मेसमध्ये जेवण केल्यानंतर मध्यरात्री सुमारे २ वाजेपासून २०० हून अधिक प्रशिक्षणार्थ्यांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा तीव्र त्रास सुरू झाला. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने रेल्वे प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच बाधित प्रशिक्षणार्थ्यांना तातडीने भुसावळ रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णांची संख्या मोठी असल्याने रुग्णालयातील यंत्रणा अपुरी पडू लागली. परिणामी अनेक प्रशिक्षणार्थ्यांना शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये हलवावे लागले.
प्रशासनाचा उशिरा प्रतिसाद?
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भुसावळ मंडळाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) विपुल अग्रवाल यांनी रेल्वे रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली व उपचारांची पाहणी केली. तसेच त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांसह ‘अन्नपूर्णा’ मेसची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
मात्र, घटना घडून सुमारे १५ तासांनंतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचल्याने रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
मुंबई–नागपूरहून मदत पाचारण
स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई व नागपूर येथून अतिरिक्त नर्सिंग स्टाफला तातडीने भुसावळला पाचारण करण्यात आले आहे. हा स्टाफ दाखल होईपर्यंत रुग्णांवर स्थानिक पातळीवर उपलब्ध साधनसामग्रीच्या आधारे उपचार सुरू आहेत.
कारण अद्याप अस्पष्ट
इतक्या मोठ्या प्रमाणात विषबाधा नेमकी कशामुळे झाली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मेसमधील स्वच्छतेचा अभाव, अन्न साठवणुकीतील त्रुटी की निकृष्ट दर्जाचा कच्चा माल, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे प्रशिक्षणार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रेल्वेच्या मेस व्यवस्थेच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


