अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ प्रणित बहिणाई ब्रिगेडतर्फे ‘ओवी गाई बहिणाई’ काव्यसंमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद!

​जळगाव (प्रतिनिधी ) – अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ प्रणित बहिणाई ब्रिगेडच्या वतीने, निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन आणि ‘ओवी गाई बहिणाई’ या विशेष काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
​जळगाव येथील बहिणाबाई उद्यानात बहिणाबाईंना आदरांजली वाहून या ‘शब्द फुलांच्या काव्य मैफली’ची सुरुवात झाली आणि उपस्थित प्रतिभावंत कवी-कवयित्रींच्या सादरीकरणाने यात ‘शब्दसुरांची रंगत’ भरली.

कवींच्या उपस्थितीने मैफलीला बहर
​या कार्यक्रमात नागपूर, सिल्लोड, नासिक, अमळनेर, भुसावळ, जळगाव आदी विविध ठिकाणाहून आलेल्या प्रतिभावंत कवी आणि कवयित्रींनी आपल्या खास शैलीत काव्य सादर केले.
​कार्यक्रमासाठी आदरणीय श्री. अरविंदजी नारखेडे, श्री. किसनजी वराडे (अंबरनाथ), श्रीमती आशाताई कोल्हे, ऍड. प्रकाशराव पाटील, श्री. प्रदीपजी भोळे, श्रीमती मायाताई धुप्पड, श्री. शशिकांतजी हिंगिणेकर, श्री. अ. फ. भालेराव, श्री. राजेंद्र रायसिंग आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून बहिणाबाईंच्या लेकींनी आयोजित केलेल्या या अत्यंत सुंदर आणि देखण्या कार्यक्रमात सहभागी होऊन बहिणाबाईंच्या स्मृतींचा आणि शब्द फुलांचा आनंद घेता आला.

आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन

​कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन जळगाव महानगराचे सन्माननीय आमदार श्री. सुरेश (राजूमामा) भोळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाची सुरुवात माय बहिणाबाईंच्या माहेरातील म्हणजेच असोदा येथील सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी बहिणाबाईंच्या निवडक काव्यावर आधारित अभिनय संपन्न नृत्याने करून रसिक श्रोत्यांची मने जिंकली.

यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक

​या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मू. जे. महाविद्यालयातील मराठी विभागातील प्राध्यापिका सौ. संध्या महाजन आणि त्यांच्या बहिणाई महिला ब्रिगेडने केले.
​प्रा. जतिन श्री. मेढे (भुसावळ) यांनी बहिणाईंच्या लेकरांचे कौतुक करत, “माय बहिणाईंचा हा सांस्कृतिक आणि वैचारिक वारसा आपण पिढ्यानपिढ्या असाच चालवत राहू,” अशी भावना व्यक्त केली.